बेळगाव लाईव्ह : भाजपने बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पुढे आल्यानंतर बेळगावमध्ये विविध राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
दरम्यान, विद्यमान खासदार मंगला अंगडी यांनी जगदीश शेट्टर यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास माझी काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जगदीश शेट्टर हे आमच्या कुटुंबातीलच आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास काहीच हरकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी त्यांचा जाहीर प्रचार करेन. शिवाय पक्षाच्या निर्णयाशी मी बांधील आहे.
आपले नाव दुसऱ्या यादीत नसल्याचे समजल्यानंतर आपण केवळ दिल्ली येथे वरिष्ठांची भेट घेण्यासाठी घेण्यासाठी गेलो होतो.
मात्र या दरम्यान जगदीश शेट्टर यांचे नाव निश्चित झाल्याचे समोर आले. पक्ष जो काही निर्णय घेईल, त्या निर्णयाशी मी बांधील आहे. जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीचे आपल्याला दुःख नसल्याचे मंगला अंगडी यांनी स्पष्ट केले.