बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मराठा बँकेच्या 7 व्या शाखेचे उदघाटन मुतगा सांबरा रोड, एस. सी. मोटर्स समोर, गांधीनगर, बेळगांव येथे उद्या सोमवार दि. 11 मार्च 2024 रोजी होणार आहे. तसेच दि. 15 मार्च 2024 रोजी गणेशपूर रोड येथे 8 वी आणि पुढील महिन्यात खानापूरातील 9 वी शाखा उघडण्यात येत आहे. यानिमित्ताने 1942 साली स्थापन होऊन आज 82 वर्षे पूर्ण करणाऱ्या मराठा बँकेचा हा अल्पपरिचय…
बहुजन समाजाला व्यापार, उद्योग, शिक्षण व घरबांधणी इ. साठी सहाय्य करणारी एखादी आर्थिक संस्था असावी, या उद्देशाने राष्ट्रवीरचे माजी संपादक कै. गुरुवर्य शामराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 1942 साली रंगुबाई पॅलेस येथे बहुजन समाजातील पुढारी मंडळीची बैठक झाली. त्या बैठकीत दि मराठा को-ऑप. क्रेडीट सोसायटी या नावाने पांगुळ गल्ली येथे भाड्याने घेतलेल्या एका लहानशा जागेत संस्थेचा शुभारंभ झाला. त्यावेळी सोसायटीचे पहिले चेअरमन कै. नागोजीराव मिसाळ हे होते. केवळ 104 सभासद व 3500 रु. भागभांडवलावर सोसायटी चालू झाली. पहिली दोन वर्षे नुकसानीत चाललेल्या या संस्थेचे 1946 साली कै. गजाननराव भातकांडे चेअरमन झाले आणि त्यानंतर भागभांडवल वाढवून 1948 साली सोसायटीचे बँकेत रुपांतर करण्यात आले. तेंव्हापासून मराठा बँक झपाट्याने प्रगती करु लागली. बँकेला स्वतःची इमारत असावी असे संचालक मंडळाला वाटू लागले. त्यामुळे 1959 साली नरगुंदकर भावे चौक येथे जागा खरेदी करून बँक स्वतःच्या इमारतीत सुरु करण्यात आली. कालातंराने असलेली जागाही अपुरी पडू लागल्यामुळे नवी अत्याधुनिक इमारत बांधण्याचे तत्कालीन संचालक मंडळाने ठरविले व 1977 साली बसवाण गल्लीतील सुंठणकर वाडा खरेदी करण्यात आला. त्या ठिकाणी अवघ्या तीन वर्षाच्या काळात सध्याची बँकेची भव्य वास्तू भरण्यात आली. त्यासाठी ज्येष्ठ संचालक कै, अर्जुनराव घोरपडे, कै. शिवाजीराव काकतकर, कै. बाळकृष्ण भातकांडे, कै. अर्जुनराव हिशोबकर, कै. सदाशिवराव हंगिरकर आदी संचालकानी विशेष परिश्रम घेतले.
मराठा बैंक ही बेळगांव शहर व आसपासच्या ग्रामीण भागातील बहुजन समाजाचा मानबिंदू आहे. बँकेच्या उर्जितावस्थेला मराठा समाजाचे भरघोस सहाय्य लाभले ही वस्तुस्थिती असली तरी इतर समाजाचेही सहकार्य लाभले आहे हे नमुद केले पाहिजे. बँकेचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव व अमृत महोत्सव साजरा झालेला आहे. बँकेला आजतागायत केद्रीय मंत्री शरदरावजी पवार, अण्णासाहेब शिंदे, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, एन. डी. पाटील, रणजित देसाई, मान, सुशिलकुमार शिंदे, ए. बी. जकनूर, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, शंकरराव चव्हाण, न्या. कोळसे-पाटील, अजित सेठ, मल्लीकार्जुन खर्गे, विलासराव देशमुख, बाबासाहेब कुप्पेकर, जयंतराव पाटील, दिग्विजय खानविलकर, ॲड. उज्वल निकम, सतेज पाटील, युवराज संभाजीराजे, के. रंगनाथन, बसवलिंगाप्पा, कै. सदाशिवराव मंडलिक, एच. के. पाटील, आमदार राजेश पाटील, रा. कृ. कणबरकर, सुभाष देशमुख, प्रा. नितिन बानुगडे -पाटील, सुरेश प्रभू आदी मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
आजच्या घडीला मराठा बँकेच्या सहा शाखा कार्यरत असून बँकेचे 12181 सभासद आहेत. भाग भांडवल 2 कोटी 81 लाख असणाऱ्या मराठा बँकेचे निधी रु. 67 कोटी 08 लाख आणि ठेवी रु. 214 कोटी 05 लाख आहेत. बँकेने 150 कोटी 98 लाख रुपयांचे कर्ज वितरण केले असून अन्य बँकांमध्ये व सरकारी रोख्यामधून रु. 129 कोटी 93 लाखाची गुंतवणुक केली आहे. बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. 4.08 टक्के आहे व नेट एन.पी.ए. ‘0’ टक्के आहे. बँकेने गेल्या दि. 31 मार्च 2023 अखेर रु. 2 कोटी 70 लाख निव्वळ नफा मिळविलेला आहे. सोने तारण कर्ज देण्यामध्ये मराठा बँक जिह्यात प्रथम आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम असून गेली अनेक वर्षे बँक आपल्या सभासदांना 15 टक्के डिव्हीडंड देत आली आहे. नवीन शाखा उदघाटनानिमित्त ठेवीवरील व्याजदर 15 महिन्याकरिता 9 टक्के व बल्क डीपॉझीटसाठी (सोसायटी डिपॉझीट) 9.10 टक्के व्याज दर ठेवलेला आहे. याची ग्राहकांनी व सोसायटी यानी नोंद घेऊन अधिकाधिक ठेवी बँकेत ठेवाव्यात असे आवाहन बँकेचे चेअरमन दिगंबर पवार व संचालक मंडळाने केले आहे.
मराठा बॅक नेहमीच सामाजिक बांधीलकी सांभाळत आली आहे, त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परिक्षेत विषेश गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलामुलींचा रोख रक्कम व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येतो. तसेच परिसरातील हायस्कूलच्या गरीब विद्यार्थाना गणवेष देण्यात येतो. वयाची 55 वर्षे व सभासद होऊन 20 वर्षे पुर्ण झालेल्या सभासदांना वृध्दापकालीन 2500 रुपयांची सुविधा देण्यात येते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी परिसरामध्ये भरविली जाणारी साहित्य संमेलने आणि वाचनालयांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. शहरातील मराठा मंदिर उभारणीमध्ये बँकेचा सिंहाचा वाटा आहे.
केंद्र सरकारने सहकारी चळवळीची निकोप, पारदर्शक वाढ व्हावी व सहकारामध्ये लोकांचा सहभाग अधिक व्हावा म्हणून सहकारी कायद्यामध्ये मोठे बदल घडवून आणले आहेत. यामुळे सहकारी चळवळीला नवीन दिशा व बळ मिळेल अशी अपेक्षा करणाऱ्या मराठा बँकेने अधिक आर्थिक सक्षम होऊन आपल्या शाखा विस्तार करण्याचे ठरविले आहे. बहुजन समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी बँकेचा सतत प्रयत्न राहिलेला आहे, असे बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.