Sunday, January 5, 2025

/

गोमातेचे महत्त्व पटवून देणारी तपोभूमी श्रीक्षेत्र रेवणसिद्धेश्वर

 belgaum

बेळगाव लाईव्ह:आजच्या आधुनिक युगात योग महर्षी श्री रामदेव बाबा देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर योगासनाबरोबरच गोमातेचे महत्त्व पटवून देत असले तरी बेळगाव शहरापासून काही अंतरावर काकती जवळ असलेल्या श्रीक्षेत्र रेवणसिद्धेश्वर या डोंगरामध्ये वसलेल्या तपोभूमीच्या ठिकाणी गोमातेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे हे विशेष होय. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी सेंद्रिय शेती आणि दूध उत्पादनाबरोबरच गोमूत्रापासून विविध आजारांवरील औषधी अर्क देखील बनविले जातात.

काकती गावापासून 3 ते 4 कि. मी. अंतरावर डोंगरामध्ये घनदाट झाडीमध्ये वसलेले श्री क्षेत्र रेवणसिध्देश्वर तपोभूमी -हुनसवारा हे एक तपस्थळ आणि तीर्थक्षेत्र आहे. अध्यात्मिक साधनेचे स्थळ असलेल्या श्री क्षेत्र रेवणसिध्देश्वर आश्रमात 130 देशी गाई आहेत. दूध उत्पादनाबरोबरच येथे गोमूत्रापासून मधुमेह वगैरे आजारांवरील औषधी अर्क बनवून रुग्ण सेवा केली जाते. या गोमूत्र अर्कांमध्ये साधा अर्क सर्पगंधा, अर्जुन, पुनर्नवा, तुलसी, मधुमेहारी, पंचगव्य आदी अर्कांचा समावेश आहे. यापैकी सर्पगंधा कर्करोग बरा होण्यासाठी तर अर्जुन अर्क हृदयासंबंधी विकार बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतो. याखेरीज मूत्रविकार, मूत्रपिंड विकार, कफ, दमा, खोकला, सर्दी, फिट्स संधिवात वगैरे विविध आजार बरे करणारे औषधी अर्क या ठिकाणी उपलब्ध आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने श्री क्षेत्र रेवणसिध्देश्वर तपोभूमी -हुनसवारा येथे भेट देऊन माहिती घेतली. यावेळी बोलताना श्री क्षेत्र रेवणसिद्धेश्वर आश्रमाचे प्रमुख प्रभू निलजकर महाराज म्हणाले की, आमच्या आश्रमामध्ये 130 देशी गाई आहेत. दूध उत्पादनाबरोबरच आम्ही गाईंच्या गोमूत्रापासून विविध व्याधींवरील औषधी अर्क बनवतो. विशेष म्हणजे आम्ही शेणखतापासून या ठिकाणी सेंद्रिय शेती करतो त्याचप्रमाणे गांडूळ खत कसे तयार करायचे याचे मार्गदर्शन देखील या ठिकाणी दिले जाते.

या गांडूळ खताचा शेतकऱ्यांनी अवलंब केल्यास त्याला खर्च कमी आणि उत्पादन जास्त मिळू शकते. त्याचप्रमाणे या खतामुळे स्वास्थ्यपूर्ण कृषी उत्पादना घेता येतात. सेंद्रिय खताची निर्मिती करण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्याकडे स्वतःची शेती, देशी गाय किंवा बैलं असली पाहिजेत आणि शेत परिसरात कोणत्याही फळांची दहा-पंधरा झाडे असली पाहिजेत. या झाडांच्या पालापाचोळ्यासह शेण-गोमूत्रापासून गांडूळ खताची निर्मिती करता येते. हे खत किट नियंत्रक असते. या खतामुळे जे कृषी उत्पादन येते त्याचे प्रमाण कमी असले तरी ते आरोग्यपूर्ण सकस असते. देशी गाय आपली गोमाता म्हणजे चालता-फिरता दवाखाना आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गाईच्या दुधासह गोमूत्रामध्ये प्रचंड औषधी गुणधर्म आहेत. आईचं दूध कमी असलेल्या मुलाला देशी गाईचे दूध पचते. जर लहान मुलाला सलग तीन वर्ष देशी गाईचे दूध पाजले तर ते भविष्यात अतिशय हुशार, तल्लख होण्याबरोबरच निरोगी राहते. आज का लोक 60 -70 रुपये लिटरने पाकिटाचे दूध घेतात. याखेरीज आपल्या मुलांचे आजार, त्यांचे शिक्षण, शिकवण्या वगैरेंवर हजारो रुपये खर्च करतात. त्याऐवजी त्यांनी शेतकऱ्याकडील 150 रु. प्रति लिटर दराने देशी गाईचे शुद्ध दूध घेतल्यास त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य देखील सुदृढ राहू शकते आणि अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला देखील आर्थिक हातभार लागू शकतो.Hunshiwari

हे झाले देशी गाईंच्या दुधाचे महत्त्व दुसरीकडे गायीच्या शेणाबद्दल बोलायचं झाल्यास शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मार्च, एप्रिल मध्येच शेतात शेणखत टाकलं जावं असं सांगितलं जातं. मात्र शेण आणि पाणी यांच्या द्रव स्वरूपातील खताचा शेतकऱ्यांनी जर सातत्याने वापर केल्यास त्यांना भरघोस पीक मिळू शकते. याखेरीज रासायनिक कीटकनाशकांऐवजी (पेस्टिसाइड) शुद्ध गोमूत्र आपण कीटकनाशक म्हणून वापरू शकतो. ज्यामुळे रान जळून जाते आणि पिकावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे शुद्ध गोमूत्र प्राशनाने कोणतीही रोगराई होत नाही. आजकालची वाढती रोगराई लक्षात घेता गोमूत्र हा त्यावर प्रभावी उपाय आहे. पूर्वी भारत कृषी प्रधान देश म्हंटले जात होते, मात्र आता तो कॅन्सरग्रस्त देश झाला आहे. आपल्या देशाला रोगराईतून वाचवायचे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि त्यासाठी जनावर अत्यावश्यक आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. आज एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असेल आणि त्याला सेंद्रिय शेती करण्याची इच्छा असेल मात्र त्याच्याकडे गाय बैल वगैरे नसतील तर आम्ही त्याला आमच्याकडील गाई देऊन सहकार्य व मार्गदर्शन करू शकतो, असे प्रभू निलजकर महाराज यांनी स्पष्ट केले.

मधुमेह, हृदयविकार वगैरे विविध व्याधी बऱ्या होण्यासाठी आम्ही गोमुत्राच्या अर्कापासून औषधे तयार करतो. मात्र आमच्या या उपक्रमाला आम्ही व्यावसायिक स्वरूप दिलेले नाही किंवा याबाबत फारसा गाजावाजा ही केलेला नाही. ज्या लोकांना कर्णोपकर्णी आमच्या औषधांबद्दल माहिती मिळते ते स्वतः या ठिकाणी येऊन किंवा बेळगावमध्ये माझ्या घरी येऊन औषध घेऊन जातात असे सांगून दरवर्षी या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे त्याचप्रमाणे वर्षभर सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महात्मा श्री रेवणसिद्धेश्वर यांची ही तपोभूमी असून हजार वर्षांपूर्वी ते भारतात ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी शिवपिंडीच्या प्रतिष्ठापणेसह या पद्धतीच्या मंदिरांची स्थापना केली. महाराष्ट्र, आंध्र वगैरे राज्यांमध्ये त्यांनी स्थापन केलेली देवस्थान आजही पाहायला मिळतात, अशी माहिती प्रभू निलजकर महाराज यांनी शेवटी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.