बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण लोकसभा निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून या मतदारसंघात एकूण २६२५८९ मतदार आपला हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी शकील अहमद यांनी दिली.
आज बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी शकील अहमद यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ग्रामीण मतदार संघाच्या मतदारांसह निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली.
भारत निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून १६ मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. कर्नाटकात दोन टप्प्यात निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून, दुसऱ्या टप्प्यात बेळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार एकूण २९४ मतदान केंद्रे आहेत.
ग्रामीण मतदार संघात १३१८१३ पुरुष, १३०७६६ महिला तर तृतीय लिंगी १० असे एकूण २६२५८९ मतदार आहेत. याचप्रमाणे २५ विभागीय अधिकारी, ४ एफएसटी संघ, ०२ व्हीएसटी पथके आचारसंहितेच्या मार्गसूचीनुसार काम पाहणार आहेत. या पथकांना निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भात आदेश दिले आहेत.
८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी विशेष मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून या मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले जाईल. मतदार संघात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला असून २४ X ७ अशापद्धतीने कॅमेरे कार्यरत राहणार आहेत.
निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांचे पथक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक काळात राजकीय मेळावे आणि कार्यक्रमांसाठी कार्यक्रमाच्या ४८ तास अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी शकील अहमद यांनी दिली.