बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या तिकिटासाठी मी देखील इच्छुक होतो मात्र पक्षश्रेष्ठींनी यावर अंतिम निर्णय घेतला आहे त्यामुळे बंडखोर उमेदवार म्हणून मी कदापि निवडणूक रिंगणात उतरणार नाही असे माजी खासदार रमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.
चिक्कोडी येथे ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात मी आजपर्यंत अनेक जनहितार्थ कामे केली आहेत. त्यामुळे यंदा विधानसभेची राज्यसभेची किंवा लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी मला आशा होती.
मात्र दुर्दैवाने तसे कांही घडले नाही. पक्षश्रेष्ठींचा निर्णय मला मान्य असला तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी आहे. मला उमेदवारी मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा आणि भाजप राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी देखील प्रयत्न केले, असे कत्ती यांनी पुढे सांगितले.
चिक्कोडी मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याबद्दल अण्णासाहेब जोल्ले यांचे मी अभिनंदन करतो. तसेच पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे स्वागतही करतो. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी बंडखोरी करणार नाही किंवा पक्षांतरही करणार नाही.
टीव्ही चॅनलच्या माध्यमातून कागवाडचे आमदार राजू कागे त्यांनी मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. त्या व्यतिरिक्त अन्य कोणीही मला भेटलेले नाही. पक्षांतर न करता आगामी काळात मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करणार आहे.
तसेच येत्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे असे सांगून उमेदवारी का मिळाली नाही? याचे निश्चित कारण आपल्याला कळू शकलेले नाही, असेही माजी खासदार रमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.