Sunday, December 22, 2024

/

समिती नेत्यांची कोंडुसकारांकडून अप्रत्यक्ष खरडपट्टी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मराठा समाज आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष कॅन्सर प्रमाणे आहेत. या कॅन्सरला उखडून टाकायचे असेल तर लोकसभा निवडणुकीसाठी आपण चांगला सक्षम, प्रत्येक प्रसंगी धावून येणारा एकच उमेदवार उभा करायला हवा, असे मत व्यक्त करण्याबरोबरच समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींची अप्रत्यक्षरीत्या चांगली खरडपट्टी काढली.

बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसभा निवडणुकी संदर्भात मते आजमावण्यासाठी आज शुक्रवारी दुपारी मराठा मंदिर येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, बैठक घेण्यापूर्वी प्रत्येकाने काय बोलायचं हे ठरवून बैठक घेणे योग्य नाही. तसेच म. ए. समितीच्या नेत्यांचा राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसमोर अवमान करण्याचे काम सध्याच्या काळात सुरू आहे. निवडणूक लढवावी तर का लढवावी? याचा विचार करायचा झाल्यास गेल्या दोन महिन्यात कन्नड सक्तीचा, कन्नड नाम फलकांचा मराठी माणसांना झालेला त्रास, जमीन संपादनाद्वारे शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास वगैरे गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. राज्यातील मागील भाजप सरकारने शेत जमिनींचे संपादन केले आणि आता काँग्रेसचे सरकार त्या जमिनीवरील बायपास रस्त्याच्या प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे. त्यासाठी पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात आहे. यापूर्वी आम्ही आंदोलनं केली, मोर्चे काढले. मात्र सध्या त्या असहाय्य शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे आहोत का? हा विचार आपण करणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपण फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करत असतो असा माझा वैयक्तिक ठाम आरोप आहे. कारण परवाच्या बैठकीमध्ये घटक समित्यांनी कन्नड नामफलकांसंदर्भात निवेदन देण्याचे ठरले होते. मग निवेदन सादर करताना सर्व नेते का उपस्थित नव्हते? खरंतर त्यावेळी सर्वांनी उपस्थित राहणे जरुरीचे होते. गट-तट घाला चुलीत, त्याच्याशी आमचा संबंध नाही. किमान आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात तरी सर्वांनी संघटित राहायला हवं. आज परिस्थिती अशी आहे की उमेदवार उभा केला नाही तर भाजपकडून पैसे घेऊन उमेदवार उभा केला नाही आणि उमेदवार उभा केला तर काँग्रेसकडून पैसे घेऊन उमेदवार उभा केला असे बोलणारे लोक आहेत. खरं तर मराठा समाज आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी हे दोन्ही पक्ष कॅन्सर प्रमाणे आहेत. या कॅन्सरला उखडून टाकायचे असेल तर आपण चांगला सक्षम, प्रत्येक प्रसंगाला धावून येणारा उमेदवार निवडायला हवा. गरज असताना कामाच्या वेळी, निवडणूक असेल त्यावेळी बेळगाव सोडून बाहेर जाणारे उमेदवार आम्हाला नकोत. या प्रकारचे नेतेही आम्हाला नकोत. गटबाजी, माझा ग्रुप तुझा ग्रुप असे न करता तळागाळातील सर्वांना सोबत घेऊन संघटितरित्या प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार निवडला गेला पाहिजे.

यापूर्वी जे घडला आहे ते सर्व आपण विसरून जाऊया. आम्ही समितीच्या नेत्यांना महत्त्व दिलेले आहे. त्यांच्या आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत. माझे विचार यापूर्वी मी माझ्या नेतेमंडळींसमोर मांडले आहेत. समितीने 750 जणांची जम्बो कार्यकारिणी केली आहे. या कार्यकारिणीची बैठकी बोलावण्यात आली. मात्र त्या बैठकीला नेतेमंडळींचा पत्ता नव्हता. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं. आम्ही नेत्यांना मायबाप मानतो आणि जर मायबापांनी आशीर्वाद देण्याचं टाळलं तर आम्ही कार्य कसं करायचं? तेंव्हा आता निवडणूक लढवायची असेल तर एकच उमेदवार द्यायचा जो सक्षम असेल, असे आवाहन नेते मंडळी करतील अशी माझी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे समितीचे कार्यकर्ते भाजपचे झालेत काँग्रेसचे झालेत असा जो आरोप केला जात आहे तो खोडून काढण्यासाठी आम्ही कोणाचे समर्थक नाही आणि कोणाच्या विरोधात नाही. जो आपल्या मराठी भाषेवर, मराठी शिक्षणावर, मराठी शेतकऱ्यांवर अन्याय करतो तो पक्ष आमचा शत्रू आहे आणि त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र एकीकरण समितीने सक्षम उमेदवार देणे गरजेचे आहे. याबाबतीत कोणाला आक्षेप असेल तर त्यांनी गप्प घरी बसावं, असे कोंडुसकर म्हणाले.

मागील निवडणुकीत बेळगाव दक्षिण मधील 62,000, ग्रामीण मधील 40,000 आणि उत्तर मध्ये 11000 मतदार बंधू भगिनींनी मला आशीर्वाद दिला आहेत. ही गोष्ट सामान्य नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघात 4.5 ते 5 लाख मराठी भाषिक मतदार असून येथील तीन मतक्षेत्र महाराष्ट्र एकीकरण समितीशी संलग्न आहेत. थोडक्यात आपण जर एकच सक्षम उमेदवार देऊन व्यवस्थितरित्या निवडणूक लढवली तर यश निश्चित आहे. किमान 3 लाख मतांचा पल्ला आपण पार करू शकतो. महापालिकेतील मराठी भाषिक नगरसेवकांसह ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत वगैरे सर्व स्तरावरील समितीच्या आजी-माजी नेतेमंडळींनी मनावर घेतलं तर हे सहज शक्य आहे असे मतही कोंडुसकर यांनी व्यक्त केले.Konduskar

बेळगाव ग्रामीणमध्ये जवळपास 1 लाख 60 हजार मराठी भाषिक आहेत खानापुरातही मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत मात्र तरीही तेथील समिती उमेदवारांना अल्पमते पडतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा तुमच्या प्रमुखांनी गांभीर्याने विचार करावा आणि येत्या काळात असा प्रकार होता कामा नयेत याची काळजी घ्यावी. कारण हा वैयक्तिक नेतेमंडळींचा किंवा उमेदवाराचा अपमान नसून समस्त समाजाचा अपमान आहे. कोणतरी येत आमचे फलक काढतं, कोणीही येतं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करतं, कोणी तरी येत मराठी मुलांविरुद्ध बोलतो आणि आपण सर्वजण मूग गिळून गप्प घरात बसतो, हे येत्या काळात होता कामा नये. कोणाला त्रास झाला तर सर्वांनी तेथे संघटित होणे आवश्यक आहे. नेते मंडळींनी फक्त आदेश द्यावा, असंख्य कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे राहण्यास तयार आहेत. मात्र तुम्हीच आवाज उठवण्यास तयार नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे.

आम्ही नेत्यांच्या विरोधात नाही, तथापि नेते मंडळींनी सुद्धा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना कामे वाटून द्यावीत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते, नेते अशा कोणत्याही सदस्याचा अपमान मी सहन करणार नाही. माझी एकच विनंती आहे की लोकसभेसाठी लवकरात लवकर एकच उमेदवार उभा करून सर्वांनी कामाला लागावे असे सांगून समितीचे नेतृत्व माझ्यावर जी जबाबदारी सोपवेल ती मी तन-मन-धनाने पार पाडीन, अशी ग्वाही रमाकांत कोंडुसकर यांनी शेवटी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.