Friday, December 27, 2024

/

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराच्या रिंगणात काँग्रेस उमेदवार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेळगावमध्ये घराणेशाहीचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रस्थापितांची हालचाल युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये स्वतःच्या कुटुंबाला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे.

बेळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी आमदार सुपुत्र आणि आमदार कन्येची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून अधिकृतरीत्या घोषणा होण्यापूर्वीच प्रचाराच्या रिंगणात आमदार कन्या उतरली असल्याचे आज दिसून आले.

चिकोडी मतदार संघासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा झाली नसली तरी पुराव्यादाखल अनेक गोष्टी दररोज समोर येत आहेत.

सतीश जारकीहोळी हे राज्याच्या राजकारणातील मास्टर माईंड म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी आपल्या कन्येला या निवडणुकीत उतरवून विजयी करण्यासाठी मास्टर प्लॅन राबविल्याचेही बोलले जात आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच समर्थक आणि चाहत्यांमधून जल्लोष पाहायला मिळत आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आधीपासूनच प्रचाराला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.Priyanka chikodi

काही ठिकाणी सतीश जारकीहोळी, प्रियांका जारकीहोळी यांचा जयजयकार ऐकू येत आहे तर काही ठिकाणी चिकोडीच्या पुढील भावी आमदारपदी प्रियांका जारकीहोळीच निवडून येतील, असे निक्षून सांगण्यात येत आहे. बहुतांशी लिंगायत मतांप्रमाणेच एससी, एसटी, कुरबर त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाची निर्णायक मतेही जारकीहोळी यांच्याकडेच झुकते माप देतील, असा निष्कर्ष राजकीय जाणकारातून व्यक्त केला जात आहे. एकंदर वोटबँकेमुळे सतीश जारकीहोळी चिकोडीमध्ये बाजी मारतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

८ विधानसभा मतदारसंघांपैकी ५ जागांवर काँग्रेस आमदार असलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघावर मंत्री सतीश जारकीहोळी यांची मक्तेदारी आहे. हुक्केरी, निपाणी आणि रायबाग मतदारसंघातील भाजपचे आमदार वगळता सतीश जारकीहोळी यांचे संपूर्ण चिकोडी जिल्ह्यावर प्राबल्य आहे.

आपल्या हक्काच्या यमकनमर्डी मतदार संघातून प्रचाराचा श्रीगणेशा केलेल्या प्रियांका जारकीहोळी यांनी त्यांचे बंधू राहुल जारकीहोळी यांच्यासह विविध गावांना भेटी दिल्या. बूथस्तरावरील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तर दुसरीकडे सतीश जारकीहोळी यांनी चिकोडी मतदार संघात तब्बल ८ ठिकाणी सलग बैठका घेत नेते आणि समर्थकांच्या बैठका घेतल्या. एकंदरीत भाजपचा बालेकिला असणाऱ्या चिकोडी मतदारसंघात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या कन्येला निवडणूक रिंगणात उतरवून सतीश जारकीहोळी रणनीती आखण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.