बेळगाव लाईव्ह :पक्ष पहिला नंतर कुटुंब, या तत्त्वाने अंगडी कुटुंबियांनी राजकारण केले आहे. परंतु, राज्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर क्षुल्लक कारणावरून वैयक्तीक टीका करत आहेत, ती त्यांनी बंद करावी. त्यांनी मंत्रिपद कसे मिळवले, याबाबत आम्ही काही बोललो का, असा पलवटवार खा. मंगल अंगडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
लोकसभेचे रणांगण जसजसे तापत आहे तसा प्रचाराला जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्री हेब्बाळकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून खा. मंगल अंगडी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपच्या तत्वानुसार आपल्या कुटुंबाने राजकारण केले आहे. स्व. सुरेश अंगडी यांनीही पक्षाची तत्वे जपत राजकारण केले आहे. त्यांच्या निधनानंतर पक्षाने मला संधी दिली.
आता त्यांनी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना संधी देऊया, असे मला विचारल्याने त्याला आपण मान्यता दिली आहे. परंतु, मंत्री हेब्बाळकर या जनतेच्या मनात विनाकारण संशय येईल, असे वातावरण निर्माण करत आहेत. बेळगाव लोकसभा मतदार संघ, राज्य व देशाच्या विकासाऐवजी त्या वैयक्तिक टीकेवर भर देत आहेत.
दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपद कसे मिळवले, हे जनतेला माहीत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते महांतेश कौजलगी, अशोक पट्टण यांना बाजूला सारून त्यांचे मंत्रीपद हिसकाऊन घेतले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असे असताना तुम्ही वैयक्तीक टीका सोडून राजकीय भाषा बोला, असा पलटवार खा. अंगडी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.