बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या पोलीस आयुक्तपदी नव्याने रुजू झालेले इयाडा मार्टिन मार्बीनांग यांनी सोमवारी पदभार स्वीकारून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आज पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद बोलाविली होती.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त इयाडा मार्टिन मार्बीनांग म्हणाले, बेळगावमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांना चाप बसवून, बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मजबुतीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य हवे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नूतन पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत काही महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. गुन्हेगारी, वाहतुकीचे प्रश्न आणि कायदा व सुव्यवस्थेविषयी माहिती घेतली आहे. शहरातील काही मान्यवर, संघ-संस्थाकडूनही माहिती घेणार आहे.
समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ बनवणार आहे. बेळगावला एक सुरक्षित शहर बनवायचा विचार असून यासाठी शहरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणार असल्याचे ते म्हणाले.
बेळगाव शहरात वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. तरीही अनेक ठिकाणी डबल पार्किंग, वाहतूक कोंडी अशा समस्या आहेत. त्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरात अमली पदार्थांच्या विक्रीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
शहराला, युवापिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी कंबर कसण्यात येईल. रिक्षाचालकांच्या समस्या तसेच काही रिक्षाचालकांकडून होत असलेली अवाजवी भाडे आकारणी यासंदर्भातही पोलीस आयुक्तांनी विचार मांडले. याबाबत जिल्हास्तरीय समितीकडून कारवाईचे आदेश आले पाहिजेत. या समितीशी चर्चा करून याला आळा घालण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
गुन्हेगारी, अमली पदार्थ विक्री प्रकरणे आदींसंदर्भातील तपासाची स्थिती तपासून तपासाला गती देणे, गुन्हेगारीला आळा घालून कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे, शहराला शांततापूर्ण आणि तणावरहित बनवणे याला आपले प्राधान्य राहणार आहे, असे नूतन पोलीस आयुक्त इयाडा मार्टिन मार्बीनांग यांनी सांगितले.