बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह:दुकाने आणि इतर ठिकाणी फलक लावत असताना कन्नड भाषेतीलच फलक असले पाहिजेत अशा प्रकारची सक्ती करून कर्नाटक सरकारच्या आदेशाचे पालन करणारे प्रशासन अत्याचार करत आहे. हा एक प्रकारे कन्नड सक्तीचा दुसरा अवतारच समोर आला असा असून या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने घेतला आहे.
हे सक्तीचे धोरण असेच राहिल्यास या पुढील काळात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून या प्रक्रियेला विरोध केला जाणार असल्याची माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पत्रकारांना बोलताना दिले.
कर्नाटक सरकारने आदेश काढला आणि त्याचे पालन करणारे प्रशासन दादागिरी ची भाषा करत आहे. या विरोधात आता रस्त्यावर उतरूनच लढा दिला पाहिजे असे ते म्हणाले. त्याचबरोबर या सक्तीला न्यायालयीन भाषेतून कसा विरोध करता येईल किंवा न्यायालयीन लढा कसा करता येईल या संदर्भातील नियोजन ही सुरू आहे. यासाठी पाच वकिलांची एक समिती गठीत करण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने न्यायिक आंदोलनावर ही भर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कर्नाटक सरकारचा एकंदर प्रयत्न सीमा भागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपवण्याचा आहे हे आता लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या आंदोलनाला साथ द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची विशेष बैठक घेऊन संबंधित निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी विविध नेते मंडळींनी आपला विरोध व्यक्त केला आहे. सीमा भागात कन्नडची सक्ती करून मराठी भाषेवर अन्याय आणि कन्नड फलक न लावल्यास दादागिरी ची भाषा या पुढील काळात खपवून घेतली जाणार नाही अशा पद्धतीचे निर्णय या बैठकीत झाले आहेत.
याबाबत पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कन्नड सक्ती विरोधात निवेदन देऊन कन्नड संघटनांना आवरा अशी मागणी करण्यात येणार आहे त्यानंतर घटक समिती यांच्या बैठक घेऊन मोठा मोर्चा काढण्यात देखील ठराव या बैठकीत करण्यात आला आहे.
सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी मनोहर जोशी आणि इतरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.बेळगावात सुरू असलेल्या कन्नड पाट्यांच्या सत्तेसाठी मराठी भाषिकांनी मोर्चे काढावेत निवेदन द्यावी याशिवाय न्यायालयाचा दरवाजा देखील ठोटावा कोर्टात याचिका दाखल करावी आणि दादागिरीचे उत्तर प्रशासनाला जशास तसे उत्तर देण्यात या अशा सूचना मध्यवर्ती सदस्यांनी मांडल्या. बैठकीस रणजित चव्हाण पाटील,गोपाळ देसाई,मालोजी अष्टेकर बी डी मोहनगेकर,रावजी पाटील बी एस पाटील, बी ओ येतोजी, नेताजी जाधव,आबासाहेब दळवी निरंजन सरदेसाई आदी उपस्थित होते.