बेळगाव लाईव्ह : २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज भाजपकडून कर्नाटकातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता असून, उर्वरित मतदारसंघातील इच्छुक आतुरतेने वाट पाहत आहेत.
भाजपच्या दुसऱ्या यादीत उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून माजी सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना स्थान मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे यामुळे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांना या निवडणुकीत तिकीट गमवावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
याचप्रमाणे बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने विद्यमान खासदार मंगला अंगडी यांचेही तिकीट हुकले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने उर्वरित लोकसभा मतदारसंघांची यादी निश्चित केली असून, बेळगावमधून जगदीश शेट्टर, चिक्कबल्लापूरमधून डॉ. के. सुधाकर, चित्रदुर्गातून माजी मंत्री गोविंद कारजोळ आणि रायचूरमधून बी.व्ही. नाईक यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
यापूर्वी जाहीर झालेले उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट न मिळाल्याबद्दल भाजपचे अनेक नेते थेट नाराजी व्यक्त करत आहेत. निवडणुकीची धुरा सांभाळणारे राज्यातील नेते तिकीट जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या नेत्यांची मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे नाराज इच्छुकांची भेट घेऊन त्यांना शांत करण्यासाठी नेत्यांची टीमही कामाला लागली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी माजी मंत्री जे.सी. मधुस्वामी यांची भेट घेतली, जे तुमकूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना या मतदार संघातून उमेदवारी नाकारल्याने सध्या ते नाराज आहेत. मात्र, त्यांनी भाजप उमेदवार सोमन्ना यांच्या प्रचाराचा निर्णय जाहीर केलेला नाही.
राज्य भाजप नेत्यांनी कोप्पळचे खासदार करडी संगन्ना, माजी भाजप आमदार खासदार रेणुकाचार्य, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यासारख्या पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांची मनधरणी केली आहे. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांची वाटचाल भाजप नेत्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. आपल्या मुलाचे तिकीट हुकल्याने नाराज असलेले ईश्वरप्पा यांनी शिमोगामधून भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
निवडणुकांची चाहूल लागताच इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळते. मात्र प्रत्येकाला तिकीट देणे शक्य नसल्याने काहींचे नशीब उजाडते तर काहींना समाधानाने वागत पुढील निवडणुकीसाठी तयारी करावी लागते. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासमोर उभ्या असलेल्या इच्छुकांच्या मांदियाळीत भाजपने काही नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काही नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात मक्तेदारी आणि वर्चस्व राखण्यासाठी भाजपचे नेते ही परिस्थिती नेमकी कशी हाताळतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.