बेळगाव लाईव्ह :जागतिक जल दिनानिमित्त बेळगांव व खानापूरच्या सर्व संघ-संस्थांनी संघटितपणे आयोजित केलेला खानापूरची जीवनदाईनी असलेल्या मलप्रभा नदी पात्राच्या स्वच्छतेचा उपक्रम आज शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला.
जगभरात आजचा 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जलदिन’ म्हणून साजरा होत आहे. या दिनानिमित्त बेळगांव व खानापूरच्या सर्व संघ-संस्थांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन ‘ऑपरेशन मदत ग्रुप’तर्फे यापूर्वीच करण्यात आले होते.
त्यानुसार आज शुक्रवारी सकाळी ऑपरेशन मदत ग्रूपसह खानापूर शहरातील लायन्स क्लब, इनरव्हिल क्लब खानापूर, आरएसएस, योगा असोसिएशन खानापूर, बार असोसिएशन खानापूर, माजी सैनिक संघटना, वरीष्ठ नागरिक संघटना, क्षत्रिय मराठा परीषद, सीटीझन्स फोरम खानापूर, नितीन पाटील फिटनेस क्लब, व्यापारी संघटना वगैरे संघ संस्थांच्या कार्यकर्त्यांनी रामलिंग देवस्थान असोगा येथील मलप्रभा नदीच्या पात्राची व आजूबाजूच्या परीसराची स्वच्छता करून जागतिक जलदिन साजरा केला.
सध्या उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नदीपात्रात साचलेल्या कचऱ्यातील विषारी घटक पुढे पावसाळ्यात नदीच्या पाण्यात मिसळून नदी दूषीत होऊ नये, यासाठी उपक्रमात सहभागी सर्वांनी उत्स्फूर्तपणे पात्रातील केरकचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली. साचलेल्या कचऱ्याचे उच्चाटन करण्यात आल्यामुळे उपक्रम ठिकाणच्या नदीपात्राने आज मोकळा श्वास घेतला.
मलप्रभा नदी घाटाला भेट देणाऱ्या भाविकांनी नदीच्या पात्रात प्लॅस्टिकचा कचरा, जीर्ण कपडे, नकोसे देवाचे फोटो, पुजेचे साहित्य, निर्माल्य टाकून नदी दूषित करू नये. तसेच खानापूर येथे नदी तिरावरील गावकऱ्यांनी आपले सांडपाणी नदीत सोडू नये. त्याचप्रमाणे या ठिकाणी सहलीसाठी वगैरे येणारे लोक स्वच्छता राखतील याची दक्षता घ्यावी.
उद्योगांचे रसायन मिश्रित विषारी पाणी प्रक्रिया करून नदीत पात्रात सोडावे असे आवाहन यावेळी ऑपरेशन मदत ग्रुप व अन्य संघ -संस्थातर्फे करण्यात आले. तसेच त्या अनुषंगाने नियमावली बनविण्यासाठी खानापूर नगरपालिका व स्थानिक ग्रामपंचायतीना लवकरच निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आगामी काळात आपली मलप्रभा नदी स्वच्छ राखण्यामध्ये खानापूरच्या प्रत्येक सामाजिक संथानी त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी सहभाग दर्शवतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी कॅ. नितीन धोंड, भाऊ चव्हाण, अजित पाटील, महेश पाटील, शिल्पा कल्याणी, आरती पाटील, सुभाष देशपांडे, गणपत गावडे, मदन सरदेसाई, श्रावणी सरदेसाई, सृष्टी सरदेसाई, शौर्य सरदेसाई, राहुल पाटील आदींसह विविध सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर राष्ट्रगीताने नदी स्वच्छता उपक्रमाची सांगता झाली.