बेळगाव लाईव्ह : राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव लोकसभेचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे.
जगदीश शेट्टर नातेवाईकांचे तिकीट हिसकावून घेत येथे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदारांनी जागरूक राहून मतदान करावे. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी मृणाल हेब्बाळकर यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे.
लोकसभा प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर व मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघात प्रचाराला प्रारंभ केला आहे.
भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्यावर टीका करताना एकाच वर्षात आपली पक्षनिष्ठा बदलणाऱ्या शेट्टर यांना तुम्ही मतदान करणार का? असा प्रश्न केला.
गतवर्षी विधानसभा निवडणुकीवेळी शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, काँग्रेसने त्यांना विधानपरिषद सदस्य केले. परंतु,
आता मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, असे म्हणत स्वतःच्या नातेवाईकांचे तिकीट हिसकावून घेत ते हुबळी सोडून बेळगावातून निवडणूक लढवत आहेत. भाजप मोदींच्या नावे आणखी किती दिवस राजकारण करणार आहे.
स्थानिक नेते केवळ पंतप्रधान मोदींवर अवलंबून आहेत. मागे सुरेश अंगडी चारवेळा निवडणूक जिंकले. त्यांच्यानंतर पत्नी मंगल अंगडी यांनी पोटनिवडणूक जिंकली. आता त्यांच्याकडून तिकीट हिसकावून जगदीश शेट्टर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदारांनी जागरूक राहून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.