बेळगाव लाईव्ह : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारीसंदर्भात अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसंदर्भात उत्सुकता शिगेला पोहोचली असून याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा नुकताच बेळगाव दौरा पार पडला.
या दौऱ्यादरम्यान चिकोडी आणि बेळगाव येथे बुथनिहाय पक्ष कार्यकारिणीची बैठक घेतल्यानंतर जे. पी. नड्डा यांनी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तासभर चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी पुन्हा अंगडी कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी तीन ते चार इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. मात्र जे. पी. नड्डा यांनी खास. मंगला अंगडी यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केल्यानंतर अंगडी कुटुंबातील नव्या सदस्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजप नेत्यांचा बेळगाव दौरा आखला जातो, त्यावेळी दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी भेट देणे हे निश्चित असते.
मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतलेली भेट आणि यादरम्यान झालेली चर्चा हि राजकीय वर्तुळात महत्वाची मानली जात असून विद्यमान खासदार मंगला अंगडी आणि श्रद्धा अंगडी – शेट्टर यांच्यासमवेत आता डॉ. स्फूर्ती अंगडी – पाटील यांचेही नाव उमेदवारीच्या रिंगणात घेतले जात आहे, हे विशेष!
लोकसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा रंगत असून जे. पी. नड्डा यांच्या भेटीप्रसंगी निवडणुकीसंदर्भात कोणते आश्वासन दिले आहे का अशा पद्धतीची चर्चाही होत आहे.
खासदार मंगला अंगडी यांच्या निवासस्थानी जवळपास तासभर रंगलेल्या चर्चेनंतर भाजप वर्तुळात उमेदवारीचा विषय मोठ्या कुतूहलाने चर्चेत आला आहे. शिवाय उमेदवारीसंदर्भात अंगडी कुटुंबियांचे नाव पुढे येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाल्याचेही बोलले जात आहे.