बेळगाव लाईव्ह:ज्या बेळगाव जिल्ह्याने कर्नाटकात दोन वेळा भाजपची सत्ता आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला, ज्याने यापूर्वी 2 खासदार व 12 हून अधिक आमदार निवडून आणले. त्या जिल्ह्यात बेळगावसाठी भाजपला स्थानिक उमेदवार मिळत नाही का? असा कांहीसा संतप्त सवाल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांमधून केला जात आहे. एकंदर बेळगावातून जगदीश शेट्टर यांना तिकीट देण्याची चर्चा सुरू झाल्यापासून त्यांच्या नावाला विरोध होत असून सोशल मीडियावर आत्तापासूनच ‘गो -बॅक शेट्टर’ अशा आशयाचे संदेश झळकू लागले आहेत.
शहरातील हॉटेल संगम येथे नुकत्याच पार पडलेल्या रा. स्व. संघ (आरएसएस) व भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पर जिल्ह्यातून उमेदवार लादण्याचा प्रकार अयोग्य असल्याचा सूर उमटला. जगदीश शेट्टर यांना हायकमांडने काय आश्वासन देऊन पक्षात घेतले हे आम्हाला माहीत नाही. परंतु हुबळी -धारवाडचे शेट्टर बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी नको, असे स्पष्ट मत यावेळी अनेक नेत्यांनी व्यक्त केले. कन्नड व मराठी भाषिकांना जाणणारा हिंदुत्ववादी चेहरा, दोन्ही भाषांसह अन्य भाषांवर प्रभुत्व असलेला उमेदवार हवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यावर पकड निर्माण केलेल्या भाजपला स्थानिक चेहरा उमेदवार म्हणून मिळत नसेल तर हे स्थानिक नेतृत्वाचे अपयश असल्याची नाराजी ही बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे कळते.
माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त पुढे करून बेळगाव लोकसभा मतदारसंघातून तिकिटाची मागणी केली आहे. माजी आमदार व भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. गेल्या महिन्यात त्यांच्यासाठी मराठा समाजाने बैठक घेऊन कन्नड व मराठी भाषा जाणारा हिंदुत्ववादी नेता म्हणून संजय पाटील यांना तिकीट देण्याची मागणी लावून धरली आहे. विद्यमान खासदार मंगल अंगडी यांनीही आपण इच्छुक असल्याचे सुतोवाच केले आहे. तथापि यापैकी कोणाच्याही नावाची चर्चा न होता जगदीश शेट्टर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हुबळी -धारवाड सेंट्रल मधून उमेदवारी नाकारल्यानंतर जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली खरी, परंतु ते पराभूत झाले. अलीकडे दोन महिन्यापूर्वीच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.
जी व्यक्ती त्यांच्या नियमित मतदार संघात स्वतःच्या चेहऱ्यावर निवडून येऊ शकत नाही अशी व्यक्ती नवख्या बेळगाव लोकसभा मतदारसंघात कितपत तग धरणार? या खेरीज विधानसभा काळात ते बेळगाव येऊन काँग्रेसचा प्रचार देखील करून गेले आहेत. या सर्व गोष्टी पाहता स्थानिक नेत्यांमधून त्यांना विरोध होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘गो -बॅक शेट्टर’ अशा आशयाचे संदेश आत्तापासूनच व्हायरल होताना दिसत आहेत.