बेळगाव लाईव्ह : २०१३-२०१८ या कालावधीत माफक दरात अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा कँटीनची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात उत्तम प्रतिसादात सुरु असलेले इंदिरा कँटीन मध्यंतरी बंद पडले. त्यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर इंदिरा कँटीन पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आले होते. मात्र ग्राहकांची कमतरता, जेवणाचा निकृष्ट दर्जा, मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अशा कारणांमुळे इंदिरा कँटीनला उतरली कळा लागल्याचे दिसून येत आहे.
शहरात येणाऱ्या गोरगरीबांना, कष्टकऱ्यांना केवळ ५ रुपयात नाष्टा आणि १० रुपयांत जेवण पुरविणे हा कॅन्टीनचा उद्देश आहे. मात्र, विविध कारणांमुळे कॅन्टीनला नागरिकांचा प्रतिसाद कमी झाला आहे. नेहरू नगर, बस स्थानक, सिव्हिल हॉस्पिटल परिसर यासारख्या ठिकाणी शहरात इंदिरा कॅन्टीनची उभारणी करण्यात आली आहे. मात्र बसस्थानक परिसर, नेहरू नगर परिसर आदी याचप्रमाणे शहरातील इतर ठिकाणी असलेले काही इंदिरा कॅन्टीन बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे.
महापालिकेकडून पुरेशा अनुदानाअभावी इंदिरा कॅन्टीन अडचणी येऊ लागल्या आहेत. गोरगरीबांना कमी दरात नाष्टा आणि जेवणाची सोय व्हावी, यासाठी इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली आहेत. मात्र, आहाराचा दर्जा, मनपाकडून योग्य अनुदान मिळत नसल्याने इंदिरा कॅन्टीन कूचकामी ठरू लागली आहेत. शिवाय नागरिकांनी देखील इंदिरा कॅन्टीनकडे पाठ फिरविली आहे.
शहरातील क्लब रोड, बसस्टँड रोड, आझमनगर, एपीएमसी आवार, नाथ पै सर्कल आदी ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभी करण्यात आली आहेत. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत येताच इंदिरा कॅन्टीनना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याकडेही आता दुर्लक्ष झाले आहे.
शिवाय इंदिरा कॅन्टीनमध्ये भाजी-भाकरीही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कॅन्टीनमध्ये सुरळीत नाष्टा आणि जेवण मिळत नसल्याने शहरातील गोरगरीब आणि कष्टकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे शिवाय आहाराच्या निकृष्ट दर्जामुळे इंदिरा कॅन्टीन ओस पडताना दिसत आहेत.