बेळगाव लाईव्ह:प्रिंट, इलेक्ट्रॉनिक नंतर आता बेळगावमध्ये ‘डिजिटल न्यूज असोसिएशन’ या नावाने डिजिटल मीडिया पत्रकारांची संघटना स्थापन झाली असून या पद्धतीची ही देशातील तिसरी अधिकृत संघटना आहे. या संघटनेचा उद्घाटन समारंभ काल गुरुवारी हॉटेल संकम येथे दिमाखात पार पडला.
डिजिटल न्यूज असोसिएशन बेळगावच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री हेब्बाळकर आणि बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) शेठ उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावना वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचा अशोक स्तंभाचे प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर आमदार सेठ यांच्या हस्ते डिजिटल न्यूज असोसिएशनच्या बोधचिन्हाचे लोगो अनावरण करण्यात आले. सदर समारंभ निमित्त बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा खास सत्कार करून त्यांना संघटनेचे सभासदत्व बहाल करण्यात आले.
असोसिएशनच्या उद्घाटन कार्यक्रमा नंतर बोलताना आमदार असिफ सेठ म्हणाली की, टीव्ही आणि वृत्तपत्रांपेक्षा जास्त आजकाल मोबाईलवर बातम्या पाहिल्या जातात, वाचल्या जातात. विशेष म्हणजे हिंदी, मराठी, कन्नड, उर्दू, इंग्रजी वगैरे सर्व भाषांमधून या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. डिजिटल मीडिया आल्यापासून आज-काल टीव्हीवर बातम्या पाहण्याचे लोकांचे प्रमाणही कमी झाले आहे.
जनहितार्थ शासनाने दिलेल्या सूचना डिजिटल मीडियावर क्षणार्धात प्रसिद्ध होत असतात. मात्र माझी संबंधित सर्वांना एकाच विनंती आहे की सत्य तेच जनतेसमोर मांडा. कारण सत्यामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्याची ताकद असते. तुम्ही सत्य समोर मांडलं तर सर्वांना खरी वस्तुस्थिती कळेल. ऊन, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता तुम्ही आमच्या सोबत राहून आम्ही केलेल्या कार्याला प्रसिद्धी देत असता. पूर्वी सकाळी उठल्यानंतर जगात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी लोक पहिल्यांदा वृत्तपत्र वाचत असतं, मात्र तो काळ आता गेला आहे. इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामुळे आता घटना घडताच तात्काळ बातमी प्रसिद्ध होते. घटनास्थळाची दृश्य फटाफट दाखविली जातात. माझ्या मते टीव्ही चॅनलच्या बातम्यांना जसे महत्व दिले जाते तसे महत्त्व डिजिटल बातम्यांना देखील मिळालेच पाहिजे. त्यामुळे यापुढे सरकारी कार्यक्रमांना डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील निमंत्रित केले जाईल याची मी ग्वाही देतो असे सांगून पुन्हा एकदा मला सांगा सारखे वाटते की प्रसिद्धी माध्यमांनी जे सत्य आहे तेच जनतेसमोर मांडावे.
आज आपल्या देशाला आणि पुढे जाऊन आमच्या भावी पिढ्यांना याची गरज आहे, असे आमदार सेठ यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी प्रसाद कंबार, कृष्णा शिंदे, दीपक सुतार, महादेव पवार आदींसह विविध इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी तसेच हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.