बेळगाव लाईव्ह :रेडी रेकनरच्या नव्या दरानुसार बेळगाव महापालिकेने शहरातील मिळकतींची घरपट्टी निश्चित केली आहे. आता नव्या आर्थिक वर्षात म्हणजे सोमवारी 1 एप्रिलपासून रेडीरेकनरच्या सुधारित दरानुसार शहरांमध्ये घरपट्टी आकारणीला प्रारंभ होणार आहे.
महापालिकेकडून घरपट्टीचे चलन ऑनलाईन दिले जाते. त्यामुळे घरपट्टी आकारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या संघटित संगणकीय प्रणालीत बदल करावा लागतो. गेल्या कांही महिन्यांपासून सुरू असलेले हे काम काल शुक्रवारी पूर्ण झाले आहे.
बेळगाव शहरातील ज्या विभागात रेडीरेकनरचे दर वाढले आहेत त्या भागातील मिळकतींची घरपट्टी वाढणार आहे. ज्या विभागातील दर स्थिर आहेत किंवा कमी झाले असतील तेथील मिळकतधारकांना मात्र दिलासा मिळणार आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाकडून ऑक्टोबर 2023 मध्ये रेडीरेकनरचे सुधारित दर जाहीर करण्यात आले होते.
त्या दरानुसार घरपट्टी आकारणी पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिलपासून होणार आहे. गतवर्षीची 3 टक्के वाढीव घरपट्टी व रेडीरेकनेरच्या दरानुसार सुधारित घरपट्टी या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी एकाच वेळी सुरू होणार आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात बेळगावकरांना घरपट्टीद्वारे मोठा आर्थिक फटका बसणार आहे.