बेळगाव लाईव्ह :खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीलायक माहिती आधारे सीसीबी पोलीस पथकाने धाड टाकून सुमारे 9 लाख 09 हजार 700 रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारूसह एकूण 10 लाख 60 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना काल गुरुवारी लक्ष्मीनगर हिंडलगा येथे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव राजेश केशव नायक (वय 41, रा. हिंडलगा, बेळगाव) असे आहे.
लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे सार्वजनिक ठिकाणी गोवा राज्यातून बेकायदेशीररित्या दारू आणून विकली जात असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली.
काल गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये विविध कंपन्यांच्या सुमारे 9,09,750 रुपये किमतीच्या 186.5 लिटर दारूच्या बाटल्या, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 1,50,000 रुपये किमतीची कार आणि रोख 350 रुपये असा एकूण 10,60,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाईबद्दल बेळगाव पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कारवाईत सहभागी सीसीबी शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.