बेळगाव लाईव्ह :रंगपंचमी सणामुळे एसएसएलसी परीक्षेला जाणाऱ्या मुलांना विलंब न होता वेळेवर परीक्षा केंद्रात पोहोचता यावे यासाठी कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने आज सोमवारी सकाळी मोफत वाहन सेवेचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेला आज सोमवारपासून प्रारंभ झाला. मात्र रंगपंचमी सण असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचण येण्याची शक्यता लक्षात घेऊन कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने वाहनांची मोफत सोय करण्यात आली होती.
सर्व भाषिक विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी असलेला हा उपक्रम बॅरिस्टर नाथ पै चौक, शहापूर येथे आज सकाळी 8:45 ते 10 वाजेपर्यंत राबविण्यात आला. गोमटेश हायस्कूल, डिव्हाइन प्रॉव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूल, भातकांडे हायस्कूल, केएलएस हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल आदी शाळांच्या 25 हून अधिक विद्यार्थी -विद्यार्थिनींना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
सदर उपक्रमाची कल्पना नसलेले जे विद्यार्थी -विद्यार्थिनी परीक्षा केंद्राकडे पायी चालत निघाले होते, अशा मुला मुलींना प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य आपल्या उपक्रमाची माहिती देऊन काळजीपूर्वक त्यांना वाहनातून परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करत होते. कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानने या उपक्रमासाठी दोन कार गाड्या आणि एका व्हॅनची व्यवस्था केली होती.
आजच्या या उपक्रमाप्रसंगी कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव, श्रीधर (बापू) जाधव, विजय जाधव, शाहू शिंदे, भाऊ शिंदे, साई जाधव, सुमंत जाधव, दिनेश मेलगे, पी. जे. घाडी, पंकज शिंदे आदी उपस्थित होते.
गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारे रंगपंचमी दिवशी दहावीची परीक्षा आली होती. त्यावेळी देखील कै. नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानने आजच्या प्रमाणे मोफत वाहन सेवेचा उपक्रम राबविला होता. याबद्दल संबंधित विद्यार्थ्यांचे पालक जाधव प्रतिष्ठानला दुवा देत आहेत.