बेळगाव लाईव्ह : २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात सरकारने सरकारी, अनुदानित आणि विनानुदानित शाळांमधील ५ वी, ८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. परीक्षा मंडळाकडून सर्व तयारी करण्यात आली असून दि. ११ पासून सुरु होणाऱ्या मूल्यांकन परीक्षेची राज्य परीक्षा मंडळाकडून मार्गसूची जारी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासण्यासाठी घेण्यात येत असलेल्या या परीक्षेसाठी जिल्हा शिक्षण खात्याकडूनही तयारी करण्यात येत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला सूचना देण्यात आल्या असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
५ वीसाठी ४ विषय तर ८ वी आणि ९ वीसाठी ६ विषयांचे पेपर घेण्यात येणार आहेत. मूल्यांकन परीक्षेला राज्यातून ६९,१३७ शाळांमधील इयत्ता ५ वीच्या ९,३०,७१५, आठवीच्या ९,३५,०७६ आणि नववीच्या ९,४८,३१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षी राज्यभरातून एकूण ६९,१३७ शाळांमधील २८,१४,१०४ विद्यार्थी मूल्यांकन परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
मराठी, कन्नड, हिंदी, उर्दु, तमिळ आणि तेलगू भाषेतून मूल्यांकन परीक्षा होणार आहे. इयत्ता पाचवीसाठी प्रथम भाषा, व्दितीय भाषा, गणित आणि परिसर असे विषय आहेत. तर आठवी व नववीसाठी प्रथम भाषा, व्दितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि समाज विज्ञान विज्ञान असे विषय आहेत.
शिक्षण खात्याच्यावतीने परीक्षा केंद्रावर फक्त प्रश्नपत्रिका पुरवल्या जाणार आहेत. उत्तरपत्रिका स्वतः विद्यार्थ्यांनी किंवा शाळेने पुरवणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी दुसऱ्या शाळेच्या पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी परीक्षा केंद्रावर संबंधित सीआरसी यांच्याकडून प्रश्नपत्रिका पुरवल्या जाणार आहेत. परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी संबंधित शाळेने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तपत्रिका एकत्रित करुन मूल्यमापन करण्यात येणार आहे. मूल्यमापनासाठी तालुक्यातील विभागवार मूल्यमापन केंद्रे स्थापन करण्यात येणार असून यासाठी विषयवार शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मूल्यमापनानंतर सर्व विद्यार्थ्यांचे गुण एकत्रित करुन शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहेत.