बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारने जारी केलेल्या गृहलक्ष्मी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये अद्याप 1 लाख 20 हजार 989 लाभार्थींची नोंदणी झाली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गॅरंटी योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र रेशनकार्डावर असणाऱ्या दुरुस्तीमुळे नोंदणी झाली नसल्याचे समोर आले आहे. तर अनेक लाभार्थींना अर्ज करूनही पैसे मिळत नसल्याची तक्रार कायम आहे.
ज्या रेशनकार्डावर कुटुंबातील पुरूष कुटुंब प्रमुख नोंद आहे अशा नागरिकांना अद्यापही या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डावर महिला कुटुंब प्रमुख म्हणून नोंद असणे आवश्यक आहे. अनेक जणांच्या रेशनकार्डावर कुटुंब प्रमुख पुरूष असल्याने ही दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दुरुस्ती करून घेण्यासाठी सोय करून दिली नसल्याने नोंदणी रखडल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. यानुसार सदर घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामधील गृहलक्ष्मी योजनेसाठी अनेक लाभार्थींनी अर्ज केले आहेत. मात्र तांत्रिक अडचणेंमुळे नोंदणी झाली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर रेशन कार्डधारकांना अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
गृहलक्ष्मी योजनेचा लाभ ज्या नागरिकांना झालेला नाही याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन माहिती घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
गृहलक्ष्मीसाठी अनेक जणांनी अर्ज केले असले तरी निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. गृहलक्ष्मी अंतर्गत नोंदणी झालेल्या त्यांच्या बँक खात्यावर निधी जमा केला जात आहे. मात्र तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्यांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. बँक अकाऊंट अपडेट न होणे, ई केवायसी न करून घेणे, बँक अकाऊंट व नोंदणी करण्यात आलेल्या नावांमध्ये तफावत असल्याने निधी जमा होत नसल्याचे समोर आले आहे.