बेळगाव लाईव्ह :सध्याच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सुळगे -येळ्ळूर, राजहंसगड झाडशहापुर आणि देसूर येथील गावकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा करणारे युवा उद्योजक गोविंद टक्केकर यांचा देसूर ग्रामस्थांतर्फे नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला.
बोअरवेल मारण्याबरोबरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करून पाणीटंचाईने ग्रासलेल्या गावाला दिलासा दिल्याबद्दल गावातील श्री चव्हाटा मंदिरासमोर नुकत्याच आयोजित खास कार्यक्रमात देसूर ग्रामस्थांतर्फे युवा उद्योजक गोविंद टक्केकर यांचा मानाचा फेटा बांधण्यासह शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गावातील पंचमंडळींसह प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सुळगे -येळ्ळूर येथे जन्मलेले आणि डिप्लोमा सिव्हिल पदवीधर असलेल्या उद्योजक गोविंद टक्केकर यांनी आपल्या भाषणात गेली 25 वर्षे आपण बांधकाम क्षेत्रात असल्याचे आणि अलीकडे 5 वर्षापासून जाएंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या क्लबच्या माध्यमातून समाजकार्य करत असल्याचे सांगितले.
तसेच आपल्या सुळगे -येळ्ळूर पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कशी प्रेरणा मिळाली याची माहिती दिली. पाणी समस्येवर मात करण्यासाठी मी माझ्या शेतात बोअरवेल मारली. तिला चार इंच पाणी लागले आणि ते पाणी आता मी स्वखर्चाने दीड कि.मी. पाईपलाईन टाकून माझ्या गावापर्यंत पोहोचवणार आहे. त्या अनुषंगाने पाण्याच्या टाक्यांसाठी स्टॅन्ड तयार केले जात असून विजेची सोय होताच गावात पाणीपुरवठा सुरू केला जाईल.
माझ्या या पाणीपुरवठा योजनेचे काम मी 20 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केले होते. देसूर गावातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी मी या ठिकाणी चार बोअरवेल मारल्या असून त्यापैकी दोन बोअरवेलना पाणी लागले आहे. लवकरच येथेही पाईपलाईन, स्टॅन्ड व टाक्यांची व्यवस्था केली केली जाईल. सध्या सुळगे, येरमाळ, राजहंसगड, देसुर आणि झाडशहापूर गावांना टँकरने पाणीपुरवठ्याची सोय केलेली आहे. कमलनगर येथे देखील टँकर पुरवठा सुरू केला होता. मात्र त्यावर दगडफेक झाल्याने तूर्तास तेथील पाणी पुरवठा सेवा बंद करण्यात आली आहे. संबंधित गावांना पाणी पुरवठा करण्याची माझी ही योजना सलग तीन महिने येत्या 15 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
योजनेतील प्रत्येक गावाला या कालावधीत पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही देऊन मात्र गावकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय न करता स्वतःसाठी व जनावरांसाठी गरजेपुरतेच पाणी वापरावे अशी विनंती उद्योजक गोविंद टक्केकर यांनी केली.