Saturday, December 21, 2024

/

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचे आवाहन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या काही दिवसात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उन्हाचा तडाखा असह्य होऊ लागला आहे. जसजसा उन्हाचा तडाखा वाढत आहे तस तशी आगीच्या घटनांमध्ये वाढ होत चाललेली दिसून येत आहे.

बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसात गवतगंजी, घरे, कारखाने, सरकारी- खाजगी कार्यालये, गोडाऊन अशा ठिकाणी आगीच्या घटना घडल्या असून या पार्श्वभूमीवर बेळगाव अग्निशामक दलाचे जिल्हा अधिकारी शशिधर नीलगार यांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना अशा घटनांपासून बचावासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

१ जानेवारी ते २१ मार्च या कालावधीत अग्निशामक दलाकडे ३ ठिकाणी आग लागल्याचे संपर्क करून सांगण्यात आले. यामध्ये तब्बल १६ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असते. मात्र अग्निशामक दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे १३ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात आले आहे.

यंदा जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली असून बेळगाव शहराचा पारा दिवसा ३४ ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचत आहे. उन्हात उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी बहुतांश लोक पंखे, एसी किंवा कूलरचा वापर करतात. यामुळे वीज यंत्रणेवर लोड वाढतो.अशावेळी वाढत्या उष्णतेमुळे ज्वलनशील पदार्थ लगेच पेट घेतात. तसेच जुन्या खराब झालेल्या वायरिंगमुळे शॉर्टसर्किट होऊन घर तसेच दुकानांचे नुकसान होते. त्यामुळे अशावेळी नागरिकांनी स्वतःहून खबरदारी घेणे गरजेचे आहे.

आगीची तीव्रता ओळखून तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करावे, असे आवाहनही शशिधर नीलगार यांनी अग्निशामक दलाच्या वतीने केले आहे. सध्या बेळगाव अग्निशामक विभागाकडे दोन वाहने सेवेत दाखल आहेत. त्यामुळे नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाच्या कार्यालयात संपर्क साधून पुढील दुर्घटना टाळण्यासाठी नक्की पुढाकार घ्यावा, कमीतकमी वेळेत अग्निशामकदलाची वाहने घटनास्थळी पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शॉर्टसर्किटसह इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरीचा स्फोट होणे, सीएनजी वर चालणाऱ्या कारमध्ये आग लागणे यासह शेतशिवारातदेखील गवतगंजींना आग लागण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. यंदाचा असमाधानकारक मान्सून, शेतकऱ्यांसमोर असलेल्या समस्या अशातच जनावरांच्या चाऱ्याची आगीमुळे निर्माण झालेली समस्या यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.Fire officer

बेळगाव शहर आणि परिसरात गॅस सिलिंडर गळतीमुळेही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच बसवाण गल्ली येथे गॅस गळतीमुळे स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर खडेबाजारमध्येही अशाचपद्धतीने सिलिंडर स्फोट होऊन दुकानाचे नुकसान झाले होते. जानेवारी महिन्यापासून आजतागायत जवळपास ९५ हुन अधिक घटना घडल्या असून यामधील सर्वाधिक प्रमाण हे ग्रामीण भागातील आहे.

या सर्व गोष्टींची खबरदारी घेत स्फोटक वस्तू जपून वापराव्यात, ज्या वस्तूंना आगीपासून धोका आहे अशा वस्तूंची योग्य ती खबरदारी घ्यावी, वाढत्या उन्हाचा अंदाज घेऊन घरात तसेच कामाच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन अग्निशामक दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.