Monday, December 23, 2024

/

बायपास विरोधात शेतकऱ्यांचे लोटांगणासह मोर्चाद्वारे निवेदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावचा झिरो पॉईंट निश्चित करूनच हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम केले जावे आणि सध्या सुरू असलेले या रस्त्याचे काम तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी आज शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी लोटांगण आंदोलन छेडून मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी पोलिसांनी दडपशाही करत हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकरी नेते राजू मरवे, रमाकांत कोंडुसकर आदींच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी आज सकाळी राणी कित्तूर चन्नमा सर्कल येथे जमून आंदोलन छेडले. यावेळी बायपास रस्त्याचे काम हाती घेतलेल्या प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सरकारच्या विरोधात घोषणा देण्याबरोबरच जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, देणार नाही देणार नाही आमची जमीन देणार नाही बोलो भारत माता की जय, जय जवान जय किसान, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा देण्यात येत होत्या.

त्याचप्रमाणे चन्नम्मा सर्कल येथून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने लोटांगण घालण्यास सुरुवात केली. मात्र त्याला पोलिसांनी आडकाठी केल्यामुळे रमाकांत कोंडुसकर, राजू मरवे आदी शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम त्वरित बंद करावे, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मोर्चाच्या अग्रभागी शेतकऱ्यांनी ‘रद्द करा रद्द करा हलगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करा’ या मागणीचे बॅनर हातात धरले होते. मोर्चादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते व प्रगतशील शेतकरी रमाकांत कोंडुसकर यांच्या आंदोलनातील सहभागामुळे आंदोलनाला एक वेगळी धार आली होती. मात्र नेमकी ही बाब कर्नाटकी पोलिसांना खटकली आणि त्यांनी आंदोलन सुरू असताना मध्येच कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून रमाकांत कोंडुसकर यांना पोलीस व्हॅनमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला.

यावेळी संबंधित पोलीस अधिकारी आणि कोंडुसकर यांच्यात शाब्दिक खडाजंगीही उडाली. कोंडुसकर यांना अटकावा करण्याच्या प्रकारामुळे उपस्थित शेतकरी अधिक संतप्त झाले. तसेच आम्ही न्यायासाठी लोकशाहीच्या मार्गाने शांततेने आंदोलन करत आहोत तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही असे बजावून पोलीस अधिकाऱ्यांच्या दपशाहीला जोरदार विरोध केला. त्यामुळे पोलिसांना अखेर नमते घ्यावे लागले.Farmers protest

राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे यांनी न्यायालयाचा आदेश डावलून जबरदस्तीने हालगा -मच्छे बायपास रस्ता करण्याद्वारे कशा पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे याची माहिती दिली. बेळगावचा ‘झिरो पॉईंट’ निश्चित झाल्याशिवाय सदर रस्त्याच्या कामाला परवानगी दिली जाऊ नये. तसेच सध्या सुरू असलेले रस्त्याचे कायम तात्काळ बंद करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

एक अन्यायग्रस्त आंदोलक शेतकरी महिलेने आमचा या बायपास रस्त्याला विरोध आहे. परवा रविवारी आमच्या शेतात घुसून हरभरा, जोंधळा वगैरे पिकांची नासधूस करण्यात आली. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले असून आमच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असे सांगून आमच्यावर इतका अन्याय केला जात असताना, मारबडव केली जात असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे म्हणणारे मोदी सरकार काय डोळे मिटून बसले आहे का? परवा आम्हाला अटक करून दिवसभर उपाशीपोटी ठेवण्यात आले. आमच्या शेतजमिनी काढून घेतल्या तर आम्ही जगायची कसे? असा सवाल केला. बायपास रस्त्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमची जमीन देणार नाही. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत विरोध करणार आहोत. आमच्या शेतजमिनी घेतल्या तर आम्ही कसं जगणार? याचा सरकारने थोडा तरी विचार करावा. आम्ही शेतकरी राबवून खाणारे लोक आहोत आम्हाला सरकारचा पैसा नको किंवा इतर काहीही नको.

फक्त आमची जमीन आम्हाला हवी. या जमिनीत आम्ही वर्षाला भात, कडधान्य आणि जोंधळा अशी तीन पिके घेतो. त्यामुळे बायपास रस्त्याची योजना तात्काळ रद्द करून आम्हाला न्याय दिला जावा, अशी मागणी आणि एका शेतकरी महिला आंदोलकांने केली. हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधातील आजच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये बहुसंख्य स्त्री-पुरुष शेतकऱ्यांसह महाराष्ट्र एकीकरण समितीची रणजीत चव्हाण -पाटील, दत्ता जाधव वगैरे नेते मंडळी आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.