बेळगाव लाईव्ह : न्यायालयाने स्थगितीचा आदेश देऊनही शेतकऱ्यांचा विरोध डावलून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर काम त्वरित थांबविण्यात यावे. शेतकऱ्यांना न्याय द्यावा, पिकावू जमीन संपादित करू नये, अशी मागणी करत रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकावू जमिनी संपादित केल्या जात आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर जमीन गमाविण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिकावू जमिनी रस्त्यासाठी संपादित करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. यामुळे सदर जमिनी घेण्यास शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून रस्त्याला पिकावू जमिनी देण्यास विरोध केला जात आहे. पोलीस बळाच्या जोरावर जमिनी संपादित करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.
न्यायालयाने रस्ते कामाला महामार्ग प्राधिकरणाला स्थगिती आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश देऊनही काम सुरू करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. नियोजित काम त्वरित थांबविण्यात यावे.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. याविरोधात पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचे पथसंचलन
बेळगाव लाईव्ह : कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलीस दलाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात सीआयएसएफचे जवानही सहभागी झाले होते.
गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास कित्तूर चन्नम्मा चौकापासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. काकतीवेस रोड, खडक गल्ली, कचेरी रोड, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली मार्गे खडेबाजार पोलीस स्थानकात येऊन पथसंचलनाची सांगता झाली. कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने निवडणूक बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी पोलिसांनी हे शक्तीप्रदर्शन केले आहे. बेळगावप्रमाणेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पोलिसांनी शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे.