बेळगाव लाईव्ह :काही महिन्यापूर्वी बेळगाव मध्ये झालेल्या कुरूप समाजाच्या मेळाव्यात चिकोडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे तिकीट कुरूबर समाजाला देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात तिकिटासाठी इच्छुक असलेल्या लक्ष्मणराव चिंगळे यांना बुडाचे अध्यक्षपद देऊन कुरूबर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार काँग्रेसने केला आहे, अशा शब्दात माजी आमदार रमेश कुडची यांनी आपली नाराजी प्रकट केली.
शहरात आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कुरूबर समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चिकोडीमध्ये कुरूब समाजाला आणि बेळगावमध्ये लिंगायत समाजाला उमेदवारी देण्यात येईल असे स्पष्ट केले होते.
मात्र आता लक्ष्मणराव चिंगळे यांना बुडा आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक असलेल्या विनय नावलगट्टी यांना गॅरंटी योजना प्राधिकरण अध्यक्ष देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे असे सांगून इतरांना चॉकलेट आणि आपल्याला मात्र बिर्याणी, असा हा प्रकार आहे, अशा शब्दात माजी आमदार कुडची यांनी आपला संताप व्यक्त केला.
बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सतत झटणारे असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आम्ही सर्व समुदायांना एकत्रित घेऊन काँग्रेसला बलिष्ठ करण्यात यशस्वी झालेलो आहोत.
त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी झटले पाहिजे, असेही माजी आमदार रमेश कुडची यांनी स्पष्ट केले.