बेळगाव लाईव्ह : बहुप्रतीक्षित भाजपच्या उमेदवारीचा तिढा काल सुटल्यानंतर बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची उमेदवारी निश्चित झाली. उमेदवारी जाहीर होताच निवडणुकीसाठी पुढील रणनीती ठरविण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराची लगबग सुरु झाली.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्यावरून बेळगावमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी ‘शेट्टर गो बॅक’चे नारे देण्यात आले.
मात्र आधीपासूनच हायकमांडने शिक्कामोर्तब केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारीवर अखेरचा निर्णय रविवारी जाहीर करण्यात आला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे येत्या बुधवारपासून प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यासंदर्भात हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले, कि हुबळी माझी जन्मभूमी असली तरी बेळगाव हि माझी कर्मभूमी आहे. होळी सण असल्याने मी बेळगावला गेलो नाही. मात्र बुधवारपासून मी प्रचाराला सुरुवात करणार आहे. बेळगावमध्ये आजवर मी बरीच कामे केली आहेत.
माझ्या विरोधार्थ निवडणूक लढविणारा काँग्रेसचा उमेदवार तरुण आहे. परंतु त्याला कमी लेखण्याची कोणतेही कारण नाही. सर्व स्तरावरील लोकांचा विश्वास संपादित करून मी बेळगावमधून नक्कीच विजयी होईन, असा मला विश्वास आहे.
शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आणायचे आहे. याच अनुषंगाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वांनी कामाला लागले पाहिजे, असे मत जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले.