बेळगाव लाईव्ह : बेळगावकर गेल्या वर्ष – दोन वर्षांपासून वन्य प्राण्यांच्या शहरातील वाढलेल्या मोर्चामुळे त्रस्त आहेत. कधी बिबट्या, कधी गवारेडा, कधी कोल्हा तर कधी हत्ती! मानवी वस्तीकडे मोर्चा वळविलेल्या वन्य प्राण्यांचा कल शहराकडे का वाढतो आहे? याचा आता गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
गेल्या तीन दिवसांपासून चंदगड सीमेवर दहशत माजविलेल्या हत्तीने बेकीनकेरे या गावापासून शहराची वाट धरली. बसव कॉलनी, शाहूनगर, कंग्राळी बीके, अलतगे आदी भागातून आज हत्तीने शहराचा फेरफटका मारला खरा! परंतु अन्नाच्या शोधात आलेल्या हत्तीने शहरात प्रवेश घेताच कित्येकांची घाबरगुंडी उडाली.
शहरातील गोल्फ मैदान परिसरात ऑगस्ट २०२२ साली बिबट्याने धुमाकूळ घातला. तब्बल २२ दिवस वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची बिबट्याला शोधण्यासाठी धांदल उडाली. या परिसरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या. येथी वाहतुकीत बदल करण्यात आला. अखेर बिबट्या हाती लागलाच नाही. कालांतराने शहरातील मंडोळी भागात आणि इतर ठिकाणी कोळ्याचे दर्शन झाले. खानापूर भागात सातत्याने गवारेड्याचा वावर दिसून येतो. या सर्व घटनांची धास्ती घेतलेल्या बेळगावकरांना १ मार्च २०२४ रोजी पुन्हा हत्तीचे दर्शन झाले. थेट मानवी वस्तीत शिरलेल्या टस्कराने सकाळ सकाळी धुमाकूळ घातला.
फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. मागीलवर्षी दरवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे. यामुळे पाण्याची कमतरता आतापासूनच जाणवू लागली आहे. याचबरोबर बेसुमार वृक्षतोड, जंगलाचा ऱ्हास अशा कारणांमुळे वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नाहीसा होत आहे. याच कारणामुळे वन्यप्राण्यांना अन्न आणि पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिणामी मानवी वस्तीत अशा प्राण्यांचा वावर सर्रास दिसून येत आहे. मानवी वस्तीकडे मोर्चा वळविलेल्या वन्यप्राण्यांकडून पशुधन, पिके नासधूस केली हात आहेत. इतकेच नाही तर वन्यप्राण्यांपासून माणसालाही अधिक धोका आहे. गेल्या दीड – दोन वर्षात शहर- परिसरात वन्यप्राणी आढळून आल्याच्या अनेक घटना घडून गेल्या आहेत.
मानव आणि वन्यप्राणी यांच्यात दिवसागणिक अधिकाधिक वाढत चाललेला संघर्ष पाहता विकासाच्या नावावर होत असलेली बेसुमार वृक्षतोड, जंगलांची होत असलेली हानी आणि वनजमिनीवर होत असलेले अतिक्रमण यासारख्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जंगलातून सुखासुखी कोणतेही प्राणी मानवी वस्तीत सहजासहजी शिरणार नाहीत. परंतु आपण विकासाच्या नावाखाली उचलत असलेली पाऊले वन्यजीवांच्या मानवी वस्तीकडे वाढणाऱ्या मोर्चसाठी कारणीभूत ठरत आहेत, हे नक्की.