बेळगाव लाईव्ह:येळ्ळूर, राजहंस गडावरील विद्युत रोषणाईसाठी पुरवल्या जाणाऱ्या विजेची झाडाच्या आडोशाला मधल्या मध्ये चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार काल सोमवारी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अलीकडच्या काळात येळ्ळूर, राजहंस गडाचा उत्तम रस्ता, विद्युत रोषणाई वगैरेद्वारे चांगल्या प्रकारे विकास साधण्यात आला. त्याचप्रमाणे गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती ही स्थापण्यात आली. परिणामी गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली मात्र या पद्धतीने प्रगती होत असताना काही आपमतलबी लोकांकडून गैरप्रकारही केले जात आहेत असा आरोप केला जात आहे.
काही मंडळी गड परिसरात आईस्क्रीम, फुलांचे हार, फळे वगैरेंची किरकोळ विक्री करणाऱ्या गरीब विक्रेत्यांना त्रास देत आहेत. धक्कादायक बाब ही की यापैकी कांहीजण चक्क मुख्य वीज वाहिनीवर आकडा टाकून गडाला पुरविल्या जाणाऱ्या विजेची चोरी करत आहेत.
सदर चोरीचा प्रकार काल सोमवारी उघडकीस आल्यामुळे घटनास्थळी गावातील नेते व गावकऱ्यांची गर्दी झाली होती. यावेळी गावकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होण्याबरोबरच वीज चोरणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
वीज चोरी संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना प्रमुख गावकरी म्हणाले की, छ. शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच आमच्या राजहंस गडाचा चांगल्या प्रकारे विकास साधण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढवून हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. या पद्धतीने सर्व काही चांगले घडत असताना कांही अनाधिकृत प्रकार वाढले असून त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या झाडाच्या आडोशाचा फायदा घेत या ठिकाणी मुख्य वीज वाहिनीवर आकडा टाकून विजेची चोरी केली जात आहे. या संदर्भात हेस्कॉमला कळवून देखील अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे ती अशा प्रकारे कोणी चोरू शकत नाही असे सांगून तरी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन वीज चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्या गावकऱ्यांनी केली.