बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तपासणी नाके उभारण्यात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. तपासणी नका उभारणीसंदर्भात अद्याप कर्नाटकाकडून निर्णय येणे बाकी असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे.
देशभरात पुढील दीड महिन्यांत लोकसभा निवडणूक घोषित होण्याची दाट शक्यता आहे. त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून ६ ठिकाणी तपासणी नाके उभारले जाणार आहेत. त्यात बेळगाव-कोवाड मार्गावर होसूर तपासणी नाक्यांचा समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी सुरू आहे. विविध पथकांची स्थापना केली आहे. सर्वेक्षण, व्हिडिओ सर्वेक्षणासोबत विविध पथकांची स्थापना केली आहे. मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे दोन राज्यांच्या सीमेवर चेकपोस्टची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्राने केली आहे.
सर्वप्रथम पाच ठिकाणी चेकपोस्ट कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने उभारले आहेत. यात अलिकडे बेळगाव-कोवाड मार्गावर होसूरला चेकपोस्टची भर पडली आहे. त्यामुळे एकूण तपासणी नाक्यांची संख्या सहा इतरी झाली आहे. याद्वारे मतदारसंघ कार्यक्षेत्रात येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून पैशाची वाहतूक, अवैध मद्यसाठा, शस्त्रसाठा, संशयास्पद वस्तु किंवा बाबींची तपासणी आणि कारवाई हाती घेऊन गुन्हे नोंदविले जात आहेत. या चौकशीचा आणि कारवाईचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर केला जात आहे.