बेळगाव लाईव्ह : महात्मा गांधी रोजगार योजना अर्थात मनरेगा अंतर्गत विविध ठिकाणी कामकाज सुरु आहे. याच योजनेअंतर्गत मौजे अलतगा या गावातील नदी पात्राच्या शेजारी कामकाज सुरु असून सदर कामकाज करण्यासाठी कंग्राळी बुद्रुक येथील महिला जात आहेत. मात्र सदर महिलांकडून नदीपात्रातील पाण्याचा ओघ कमी होण्याआधीच कामकाज सुरु असल्याचा आरोप अलतगा येथील ग्रामस्थांनी केला आहे.
यासंदर्भात अलतगा येथील ग्रामस्थ चंद्रकांत धुडूम यांनी माहिती देताना सांगितले, अलतगा येथील मार्कंडेय नदीपात्राशेजारी सुरु असलेल्या मनरेगा अंतर्गत कामकाजादरम्यान नदीपात्रातील पाण्याचा ओघ कमी न होताच खोदकाम सुरु करण्यात आले आहे. परिणामी नदीपात्राच्या शेजारी असलेल्या जनावरांसाठी उपयुक्त असा चाराही निरुपयोगी ठरत आहे.
नदीपात्राशेजारी गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. शेतीच्या बांधावर जनावरांसाठी चारा पिकविण्यात आला आहे. मात्र कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायती मार्फत पुरविण्यात आलेल्या रोजगार योजनेतील महिला याठिकाणी खोदकाम करण्यासाठी येत आहेत. मनरेगा योजना हि एका विशिष्ट दृष्टिकोनातून राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेचे नियोजन योग्य नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. वास्तविक पाहता नदीपात्रातील पाणी कमी झाल्याशिवाय खोदकाम करणे हे बेकायदेशीर आहे.
परंतु रोजगार योजने अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी पाणी कमी होण्याआधीच खोदकाम सुरु केले आहे. शिवाय नदीपात्राशेजारी असलेल्या शेतजमिनीच्या बाजूने देखील खोदकाम करून जनावरांसाठी असलेल्या चारही नष्ट केला आहे. यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हि बाब कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पीडीओंनी गांभीर्याने लक्षात घेऊन सदर कामकाज त्वरित बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने चंद्रकांत धुडूम यांनी केली.
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने आधीच शेतकऱ्यांना चाराटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच मनरेगांतर्गत होत असलेल्या कामकाजात अशापद्धतीने चाऱ्याची विल्हेवाट लावली जात असून हे निषेधार्ह आहे.
अलतगा येथे झालेल्या कामकाजामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी गांभीर्याने लक्ष पुरवून तातडीने यावर उपाययोजना करावी, अशा आशयाचे निवेदन आज अलतगा ग्रामस्थांनी तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांना सादर केले आहे. सदर कामकाज तातडीने बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.