बेळगाव लाईव्ह:बेंगलोर ते बेळगाव या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या यशस्वी चांचणीनंतर गेल्या हिवाळी अधिवेशनात तिची सुरुवात होण्याच्या आशा जास्त होत्या. तथापि, रेलसेवा अद्याप कार्यान्वित न झाल्याने अपेक्षा निराशेत बदलली असून विलंबामागील कारणांमुळे बेळगाववासियांसह अधिकारी हैराण झाले आहेत.
बेळगावला वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास झालेल्या विलंबामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषत: माहिती हक्क अधिकाराच्या (आरटीआय) चौकशीत पिट लाइनवर ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) बसवणे आणि बेळगाव स्थानकावरील पाणी पुरवठ्याचा अभाव हे एकमेव अडथळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या समस्यांचे तीन महिन्यांपूर्वीच निवारण करण्यात आले होते.
त्यामुळे सततच्या विलंबाच्या कारणाबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत आहे. नैऋत्य रेल्वे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर प्रकाश टाकताना वंदे भारत रेल्वेचा विस्तार बेळगावपर्यंत केल्याने एकूण प्रवासाचा कालावधी दररोज 17 ते 18 तासांपर्यंत वाढेल.
यामुळे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा उद्देश सफल होणार नाही, असा दावा केला. तथापि या स्पष्टीकरणाने भुवया उंचावल्या आहेत. कारण वंदे भारत रेल्वेगाड्या इतर ठिकाणी अशाच अडथळ्यांशिवाय समान कालावधीसाठी धावतात. प्रवासाच्या वेळेची तुलना केल्यास, हे लक्षात घेण्यासारखे आहे की सकाळी बेंगलोरहून सुटणारी वंदे भारत रेल्वे 5 ते 6 तासांत धारवाडला पोहोचू शकते.
परतीच्या प्रवासालाही सुमारे 6 तास लागतात. तसेच देखभालीसाठी एक अतिरिक्त तास लागतो. तथापी बेळगावपर्यंत विस्तारित वंदे भारत रेल्वे सेवेचा एकूण कालावधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 16 तास 5 मिनिटांचा असेल. ज्यामुळे तो कलबुर्गीपर्यंतच्या वंदे भारत सेवेच्या कालावधी पेक्षा कमी होईल आणि 18 तास 15 मिनिटे लागतील.
अटकळी भरपूर असल्याने विलंबामागील संभाव्य हेतूंकडे लक्ष वेधले जात आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता केंव्हाही लागू होण्याची दाट शक्यता असल्याने, निवडणुकीपर्यंत नवीन गाड्यांची घोषणा होणार नाही. त्यामुळे बेळगावच्या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण हा विलंब मे महिन्याच्या अखेरपर्यंत होण्याची भीती आहे. तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल आणि केंद्रात नवे सरकार स्थापन होईल.
प्रलंबित प्रश्न उरतो तो जर डिसेंबरमध्ये घेण्यात आलेली चांचणी यशस्वी ठरली आणि आवश्यकता पूर्ण झाल्या असताना वंदे भारत ट्रेन बेळगावपर्यंत आणण्यास कोण किंवा कशामुळे विलंब होत आहे? एकंदर बेळगाववासियांची निराशा वाढतच चालली आहे. त्यांना उत्तर हवे आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येचे त्वरित निवारण करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.