बेळगाव लाईव्ह :विद्यमान महिला व बालकल्याण आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या अधिकृत यंत्रणेचा गैरवापर करत असून हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची लेखी तक्रार बेळगाव ग्रामीण मंडळ भाजप अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी बेळगाव ग्रामीण यांच्याकडे केली आहे.
विद्यमान महिला व बालकल्याण आणि दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यानी अंगणवाडी कार्यकर्त्या, पर्यवेक्षक आणि आशा कार्यकर्त्या, पर्यवेक्षक यांची बैठक बोलावली आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना या बैठकीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे आणि त्यांच्यासाठी वाहतुकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
संबंधित वाहने लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासी कार्यालयाच्या ठिकाणाहून 20 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना गाव पातळीवरील काँग्रेस प्रचारासाठी घेऊन जाणार आहेत. या पद्धतीने विद्यमान मंत्री आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याद्वारे अधिकृत यंत्रणेचा गैरवापर करत आहेत.
श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांची ही कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांना सरकारकडून मानधन मिळते आणि मंत्री मात्र आपल्या अधिकार पदाचा फायदा घेत त्यांच्यावर दबाव आणण्याद्वारे त्यांना काँग्रेसच्या बैठकीस हजर राहण्यास सांगत आहेत. हे मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक संकल्पनेच्या विरुद्ध असून अधिकृत यंत्रणेचा सत्ताधारी पक्षाकडून गैरवापर केला जात आहे.
मंत्र्यांनी आपल्या अधिकृत भेटी निवडणुकीच्या कामाशी जोडू नयेत. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या कामावेळी अधिकृत अथवा वैयक्तिक यंत्रणेचा वापर करू नये असे आदर्श आचारसंहिता सांगते. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग आदर्श आचारसंहिता लागू करू शकतो आणि तिचा भंग करणाऱ्या उमेदवारावर बंदी घालू शकतो.
त्यामुळे पक्षाची विनंती आहे की निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर आणि काँग्रेस पक्ष यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी.
तेंव्हा कृपया तात्काळ शहानिशा आणि चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशा आशयाचा तपशील भाजप बेळगाव ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद आहे.