बेळगाव लाईव्ह : कन्नड भाषा समग्र विकास विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यात कन्नड सक्ती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगावमधील कन्नडसक्तीने जोर धरला असून आज बेळगावमधील विविध परिसरातील आस्थापनांवर असलेले कन्नडेतर नामफलक हटविण्यासाठी मनपाने मोहीम तीव्र केली.
भारतीय राज्यघटनेच्या कलम २९ आणि ३५० अ नुसार आपली भाषा जपण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र लोकशाहीतील नियमांना नेहमीच हरताळ फासणाऱ्या कर्नाटक प्रशासनाने आपला हटवादिपणा कायम ठेवत पुन्हा कन्नडसक्तीचा बडगा उगारला आहे. आज शहरातील बापट गल्ली, गांधीनगर परिसरासह पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या उपनगरांमधील आस्थापनांचे नामफलक देखील हटविले आहे.
कन्नड व्यतिरिक्त अन्य भाषेतील नामफलक देखील हटविण्यात आले असून बेळगाव महापालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश यांच्या आदेशानुसार मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेच्या पथकाने बेळगावात आज, मंगळवारी कन्नड व्यतिरिक्त इंग्लिश व अन्य भाषांमधील दुकानांचे फलक हटविण्याची कारवाई केली आहे.
शहरातील बापट गल्ली, कार पार्किंग व आजूबाजूच्या परिसरात तसेच गांधीनगर व परिसरात फलक हटाव मोहीम राबविण्यात आली. मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे तसेच महसूल विभागाचे उपायुक्त गुरुनाथ यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य निरीक्षक व महसूल निरीक्षक व मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने व आस्थापनांवरील कन्नडेतर भाषांमधील नामफलक हटविले.
बापट गल्ली व कार पार्किंग परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. कार पार्किंगमध्ये खुद्द महापालिकेचाच पे पार्किंगचा बोर्ड इंग्लिश भाषेत असलेला आढळून आला. तोही हटविण्यात आला. अनेक ठिकाणी दुकानमालक स्वतःच फलक हटवताना दिसून आले.