शिष्य : गुरुजी सहा महिने झाले बोललाच नाही. असं गप्प बसला तर कसं होईल? आमची अवस्था चक्रीवादळात सापडल्यासारखी झालेय, कुणाचं खरं कुणाचं खोटं तेच समजेना झालंय. त्यातच निवडणूक सुरू झाली…
गुरुजी: मी गप्प बसलो नाही. थोडं भारत भ्रमण करून आलो.. देशाचा मूड काय आहे? देशाचा नूर काय आहे? देशाची आवड निवड काय आहे? सध्याची देशाची परिस्थिती काय आहे? हे पाहणं गरजेचं वाटलं म्हणून भारत भ्रमण करून आलो…
शिष्य: गुरुजी तुम्ही भारत भ्रमण करून आलात की भारत जोडो यात्रेत जाऊन आलात?
गुरुजी : अरे, आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाच्या भूमिकेशी काही देणं घेणं नसतं.. आपलं काम निरीक्षणाचं आहे आणि त्यावर परीक्षण करून आपलं विवेचन सादर करणे हे आपलं काम आहे.. आपण काय करत आहोत, की जगात माणसांना कसं वागावं, बोलावं, चालावं याचं विवेचन करतो..
शिष्य : गुरुजी, मग तुम्हाला काय आढळलं ? काय चाललंय देशात? देशाचा आढावा काय आहे?
गुरुजी: वत्सा, देशाची हाल हवा वेगळीच आहे… ईडीची गाडी जोरात आहे! जो त्या गाडीत चढतोय त्याला जेलमध्ये नाही तर मंत्रालयात नेऊन मंत्री बनवलं जातंय! दिल्लीचा मुख्यमंत्री जेलमध्ये आहे! तिथून राज्यकारभार चालतो आहे! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ईडीच्या भीतीनेच पक्ष आणि मंत्रीपद सोडून मुख्यमंत्री पदावर येऊन बसला! एकाचा घड्याळ जाऊन तुतारी आली तर एकाचा धनुष्यबाण जाऊन मशाल मिळाली!
शिष्य : गुरुजी पूर्ण देश फिरून आला पण आमचा सीमाभाग असाच अजून वाळवणीत पडला आहे. उन्हाळ्यात पंधरा-वीस दिवस वाळवण करतात पण गेली 67 वर्षे सीमा भागात अशाच पद्धतीने वाळवण सुरू आहे… हे कधी संपणार??
गुरुजी: अरे, तुला कळत नाही. इथल्या जनतेला, नेत्यांना कुणालाच आता या भागाचं काहीच पडलेलं नाही. तिकडे राष्ट्रीय पक्ष स्वतःच्या नादात मश्गुल आहेत. इकडे समितीचे नेते बॅग भरण्यात मश्गुल आहेत. स्वतःची तिजोरी भरण्याचा कारभार चालू आहे.. होणार काय देशाचं म्हणतोस तू? तुझ्या भागाचं काय होणार हे तू विचार कर. तुझ्या भागाचं काय होणार हे आता साक्षात ब्रह्मदेवाला ही कळेनासं झालं आहे!
शिष्य: गुरुजी, तुम्ही हताश झालाय.. निराश झालाय..
गुरुजी: मी निराश कशाला होणार? मी केवळ विश्लेषण करणार.. विवेचन करणार… इतिहास आणि भूगोल हा अनंत काळाचा असतो यात क्षणकाळाच्या गोष्टीसाठी मी कशाला हताश होऊ??
शिष्य: तुमचं काय निरीक्षण आहे गुरुजी? काय चाललंय या भागात?
गुरुजी: अरे इथं घराणेशाहीला ऊत आला आहे. जे पक्ष घराणेशाहीच्या नावाने आरडाओरडा करत होते, त्यांनी सासरा, सून, जावई, सासू सगळ्यांना पदं बहाल करायचा ठरवलेलं आहे. कित्येक वर्षे कार्यकर्ते सतरंज्या उचलण्यात, पताका लावण्यात व्यस्त होते आता त्यांचेही कंबरडे मोडले आहे. राष्ट्रीय पक्षांना केवळ एकाच घराण्याशी संबंधित लोकांची उमेदवारीसाठी नावे दिसतात हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही..
शिष्य: मग दुसऱ्या पक्षाचं काय म्हणता?
गुरुजी: कुणाचं म्हणतोस? ‘हात’ वाल्यांचं? ‘हात’वाल्यांनी तर आपल्या जनतेचा पहिलाच घात केलाय.. समितीचे, आमचेच लोक मागच्या निवडणुकीत त्यांच्या दावणीला बांधले गेले. आपल्या लोकांना आपल्या दावणीचं गवत गोड लागत नाही! तिकडं ‘पेंड’ खाल्लेली लोकं आपल्याकडे ‘कडबा’ कशी खातील??
शिष्य: गुरुजी मग आपली लोक परत येणार नाहीत?
गुरुजी: आपले लोक आता आपले राहिले नाहीत. ते कधीच तिकडं पोहोचलेत. उन्हात बसून पोटाला मिळतंय म्हणून तिथे सुखी आहेत.
शिष्य: मग गुरुजी उत्तर, दक्षिण काय होणार?
गुरुजी: अरे त्यांच्यात आपापसातच सुंदोपसुंदी चालली आहे. मागच्या वेळेचा उमेदवार म्हणतोय, हे मतदार माझे आहेत, नवीन उमेदवार म्हणतोय की मी आता इथं कसा रुजू? कोण म्हणतोय मी कसा गाजू? यामध्ये आता बॅगांची गणितं सुरू झाली आहेत! आमचे नेते धावाधाव करत आहेत.
शिष्य: गुरुजी, मग हा घोडेबाजार थांबणार का?
गुरुजी: वत्सा, तू किती मूर्ख आहेस! अरे याला घोडेबाजार नाही म्हणत. याला गाढव बाजार म्हणतात! ज्यांच्या तबेल्यात घोडे असतात त्यांचा घोडेबाजार होतो! इथे सगळीच गाढवं पाळली गेली आहेत. तिथे घोडेबाजार कुठून होणार??
शिष्य: गुरुजी तुम्ही अशापद्धतीने आमच्यावर टीका करताय? तुम्ही असे बोल आमच्यावर लावताय? हे आम्हाला काय आवडलं नाही! आमच्या मनाचा तरी विचार करायचा…
गुरुजी: तुमची मनं तुमच्या ताब्यात आहेत कुठं? ती कधीच विकली गेली आहेत!! अरे लोक तुमचे बोर्ड पाडतात, तुमची भाषा शाळेतून बंद करतात, तुम्हाला तुमच्या भाषेतून परिपत्रकं देत नाहीत.. तुमच्या जमिनी हडपून नवीन लोकांच्या वसाहती बसवल्या जातात. तरीही तुम्ही अजून सुधारत नाही! तुमच्यासारख्या लोकांना मन आहे म्हणण्यापेक्षा तुमच्या मनाच्या ठिकाणी दगड आहेत असं म्हणावं लागेल!!!
शिष्य: गुरुजी तुम्ही आमच्यावर खूप ताशेरे ओढताय! सध्या तुम्ही आम्हाला कोणत्या खिसगणतीत घेत नाही असं वाटतंय. हा आमचा अपमान आहे.
गुरुजी: अपमान?? ज्याला मान असतो त्याचाच अपमान होतो! तुमचा मान कुठे शिल्लक आहे? तुमच्या नेत्यांनी तो कधीच गहाणवट ठेवलाय..!!! राष्ट्रीय पक्षांकडे…!! ज्यांचा मान असतो त्यांचा सन्मानही होतो! तुमचा सन्मानही नाही आणि अपमानही नाही! तुम्ही कोडगे आहात!
शिष्य : गुरुजी तुम्ही आमच्या बाबतीत फारच कठोर झाला आहात असं वाटतंय..
गुरुजी : कठोरही नाही! कठोर दगडाशी होतात. दगडालाही महत्त्व आहे! उचलून कशाला मारला तर एखादं फळ तरी पडेल. तुमच्या हातून तेही पडणे बंद झाले आहे!!
शिष्य: गुरुजी म्हणणं तरी काय आहे?
गुरुजी: अरे शड्डू मारून उभं राहिलात तर त्याला लढणे म्हणतात. इथं तुम्ही कालच्या सभेत हजारोंच्या संख्येने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या भाषा करता? इतके उमेदवार आहेत तरी का तुमच्याकडे? हजारोंच्या संख्येने उमेदवार उतरवले तर त्यांचं समर्थन करण्यासाठीही हजारो समर्थक लागतात. ते कुठून आणायचे? समितीची बैठक संयुक्त पद्धतीने घेता… दोनशे कार्यकर्ते उपस्थित नव्हते.. आणि त्यानंतरची दंगल तर खूप मोठी होती. शिष्य : गुरुजी हे सगळंच निराशाजनक आहे.
गुरुजी : निराशाजनक म्हणायचे कारण नाही. याला आशेत बदलायचे असेल तर नवीन नेतृत्व उभं करणे गरजेचे आहे. नवीन माणसं समितीत आणणे गरजेचे आहे. जुन्यांनी सुधारले पाहिजे. तर समिती व्यवस्थित राहील.
शिष्य : गुरुजी यावर उपाय तरी सांगा…
गुरुजी : अरे, तुला मग आता काय सांगितलं? हाच उपाय..
शिष्य : हे तर आम्ही कधीपासून सांगतोय.. लोकांना समितीत येण्याची विनंती करतोय. समिती आपली आहे.. आपल्या मराठी माणसांची आहे.. मराठी माणूस एकसंघ झाल्याशिवाय आपण लढा तीव्र करू शकत नाही..
गुरुजी : सामान्य मराठी माणूस एकच आहे. नेतेमंडळीच लाथाळी सुरु आहेत. आणि या नेतेमंडळींच्या लाथाळीमुळे सामान्य जनता कावलेली आहे. त्यांची जगण्यासाठी दररोज झुंज सुरु आहे. आणि तरीही मराठीच्या पाठीशी उभं राहतात. प्रत्येक निवडणुकीत देणगीदाखल आर्थिक मदत देतात. मत देतात. आणि राष्ट्रीय पक्ष यांची मते हजारो रुपयांनी विकत घेण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळीही ती तिकडे जात नाहीत. तर तुम्ही स्वतः करंटेपणाने त्यांना तिकडे जाण्यास भाग पाडता. अरे, तुम्हाला जर काही अक्कल असेल, लाज लज्जा असेल, तर एकच उमेदवार उभा करून त्याच्या पाठीशी समस्त मराठी भाषिकांना उभं करा… तुमचा विजय निश्चित आहे. जय कशाला आणि पराजय कशाला म्हणायचं?
तर आपली माणसं सगळी एकत्र आली तर त्याला जय म्हणतात. आणि लोक चारही दिशांना विस्कळीत झाली तर त्याला पराजय म्हणतात. या पराजयाच्या व्याख्या आहेत, हे लक्षात घे. छत्रपती शिवरायांची प्रेरणा घ्या.. ३५० वर्षांनंतरही थोर पुरुषाचे नाव जिवंत आहे, याला कारण त्यांनी दिलेली लढण्याची, भिडण्याची आणि कडाडण्याची प्रेरणा दिली. शिवरायांचा आदर्श घेऊन पुढं गेलात तर मराठीला सन्मान मिळेल. नाहीतर अपमानात मराठी घातल्याचा दोष तुमच्या माथी येणार यात काही शंकाच नाही.