बेळगाव लाईव्ह : येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवासी संघटनेचा २२ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांतर्गत उत्साहात पार पडला.
वाड्-मय चर्चा मंडळ येथे आयोजिण्यात आलेल्या या सोहळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सौ गिरीजा कुलकर्णी यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. एम. के. पाटील यांनी प्रास्तविक आणि गंगाराम कंग्राळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. यावेळी मराठा संघाच्या अध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक निंगाप्पा पाटील, महादेव भांदुर्गे, प्रभाकर बसरीकट्टी, मधुकर वेसणे, शिवाजी बेकवाडकर,श्रीकांत पाटील आणि श्रीमती सुनंदा जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या सरस्वती पाटील यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्व पटवून दिले. यानंतर राजेंद्र मुतगेकर, प्रभाकर बसरीकट्टी, शिवाजी बेकवाडकर आदींची समयोचित भाषणे झाली.
वर्धापनदिनाच्या औचित्याने आयोजिण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. पाटील यांनी तर आभार अशोक थोरात यांनी मानले. या कार्यक्रमास संघटनेचे तसेच संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.