बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी काही तास आधीच बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले असून आज त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतरही गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या शासननियुक्त पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यानुसार बेळगाव नगर विकास प्राधिकरण अर्थात बुडा या संस्थेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या नगरविकास खात्यांतर्गत नगर योजना प्राधिकरणच्या प्रधान सचिव लता के. यांनी काढला आहे.
बेळगाव शहरातील महानगरपालिकेपाठोपाठ बुडा ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. नगर विकास प्राधिकरण हे कर्नाटक नगर आणि देश नियोजन अधिनियम, 1961 अंतर्गत नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले गेले आहे.
या पदावर चिंगळे यांची नियुक्ती करून निष्ठावंत नेत्याचा सन्मान करण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. चिंगळे हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
यापूर्वी त्यांनी राज्य सरकारच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद, राज्य सहकारी बँक अर्थात अॅपेक्स बँकेचे संचालक आदी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.