बेळगाव :राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 5 वी, 8 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या धर्तीवर मूल्यमापन बोर्ड परीक्षा घेण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य शालेय शिक्षण खात्याने येत्या सोमवार दि. 25 मार्चपासून पाचवी आठवी व नववीच्या परीक्षेचे उर्वरित पेपर घेण्याचा आदेश दिला आहे.
खाजगी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन मंडळाने इयत्ता पाचवी आठवी व नववीच्या बोर्ड परीक्षा विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे या परीक्षेला अर्ध्यावर ब्रेक लागला होता. मात्र गेल्या शुक्रवारी न्यायालयाने परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर शिक्षण खात्याने परीक्षेच्या शिल्लक असलेल्या पेपरचे तातडीने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.
सोमवारपासून परीक्षेला सुरुवात होणार असली तरी याच काळात दहावीच्या परीक्षेलाही प्रारंभ होणार आहे. दहावी परीक्षेचे पेपर सकाळच्या सत्रात घेतले जाणार आहेत. त्यामुळे ज्या दिवशी दहावीचा पेपर असेल त्या दिवशी पाचवी आठवी व नववीचा बोर्ड परीक्षेचा पेपर दुपारच्या सत्रात घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे दहावीचा पेपर नसलेल्या दिवशी सकाळच्या सत्रात परीक्षा घेतली जाणार आहे.
बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक (अनुक्रमे इयत्ता, दिनांक, विषय, वेळ यानुसार) पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता पाचवी : 25 मार्च -परिसर अध्ययन, दुपारी 2:30 ते 4:30 वाजेपर्यंत. 26 मार्च -गणित, सकाळी 10 ते दुपारी 12 वा..
इयत्ता आठवी : 25 मार्च -कन्नड /इंग्रजी तृतीय भाषा, दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वा.. 26 मार्च -गणित, सकाळी 10 ते दुपारी 12:30 वा.. 27 मार्च -विज्ञान, दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वा.. 28 मार्च -समाज विज्ञान, सकाळी 10 ते दुपारी 12:30 वा.
इयत्ता नववी : 25 मार्च -कन्नड /इंग्रजी तृतीय भाषा, दुपारी 2 ते सायं. 5 वा.. 26 मार्च -गणित, सकाळी 10 ते दुपारी 1:15 वा.. 27 मार्च -विज्ञान, दुपारी 2 ते सायं. 5:15 वा.. 28 मार्च -समाज विज्ञान, सकाळी 10 ते दुपारी 1:15 वाजेपर्यंत. दरम्यान,
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर माध्यान्ह आहार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर किती विद्यार्थी परीक्षा देणार आहेत याची माहिती संकलित करण्यात आली असून पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वितरण केले जाणार आहे.