Sunday, November 17, 2024

/

प्रभावशाली इच्छुकांच्या दबावामुळे भाजप, काँग्रेस नेतृत्वाची कोंडी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारीसाठी कांही प्रभावशाली इच्छुकांकडून प्रचंड दबाव येत असल्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाची कोंडी झाली आहे.

भारतीय जनता पक्षाने चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची उमेदवारी निश्चित केली असली तरी बेळगावसाठी उमेदवार निवडण्यात मात्र हा पक्ष अद्याप असमर्थ ठरला आहे तथापि सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नांव निश्चित केले आहे. दरम्यान, बेंगलोर येथून गेल्या शुक्रवारी हुबळीमध्ये परतलेल्या शेट्टर यांनी भाजप संसदीय मंडळाचे सदस्य बी. एस. येडीयुरप्पा आणि राज्य पक्षाध्यक्ष डी. वाय. विजयेंद्र यादोघांनीही मी बेळगावच्या जागेसाठी निवडणूक लढवावी या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेला दुजोरा दिला असल्याचे सांगितले.

दुसरीकडे उमेदवारीसाठी काँग्रेस पक्ष नेतृत्वावरील दबाव वाढत असल्यामुळे बेळगाव आणि चिक्कोडीमधील नेत्यांना उमेदवार निश्चित करण्यासाठी द्वंद करावे लागत आहे. तथापि काँग्रेस हाय कमांड या दोन्ही मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना अथवा युवा नेत्यांना उतरवण्यास उत्सुक नसले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांना अनुक्रमे चिक्कोडी आणि बेळगाव मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी देण्याचा आग्रह धरला जात आहे.

या संदर्भात चिकोडी लोकसभा मतदारसंघातील विविध भागातील सतीश जारकीहोळी यांच्या सहयोग्यांनी गेल्या शुक्रवारी गोकाक येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन आपल्या पाठिंबाचे आश्वासन दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रायबाग येथे देखील काँग्रेस नेत्यांची बैठक होऊन त्यांनी प्रियांका यांना आपला पाठिंबा व्यक्त केला चिकोडी मधील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 मध्ये भाजप आणि 5 मध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. परंतु काँग्रेसने अद्याप प्रियांका जारकीहोळी यांचे नांव अधिकृत जाहीर केलेले नाही. चिक्कोडीतील काँग्रेसच्या तिकिटासाठी लक्ष्मणराव चिंगळे आणि प्रकाश हुक्केरी आणखी दोन प्रबळ दावेदार आहेत.

बेळगावच्या जागेसाठी ॲड. मोहन कातरकी, डॉ. गिरीश सोनवलकर, विनय नावलगट्टी, किरण साधूनावर यांच्यासारखे नवीन चेहरे काँग्रेसचे तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. तथापि मंत्री हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल यांचे नांव एकमताने उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.

बेळगावसाठी भाजप उमेदवार म्हणून जगदीश शेट्टर यांचे नांव निश्चित होण्याची शक्यता असल्यामुळे काँग्रेस नेतृत्व या ठिकाणी जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.