बेळगाव लाईव्ह:भारतनगर, वडगाव येथील ड्रेनेज गेल्या अनेक दिवसांपासून तुंबले असून सध्याच्या उन्हाळ्यात आसपासच्या विहिरींचे पाणी खराब होत असल्याने युद्धपातळीवर ड्रेनेजची स्वच्छता करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
भारतनगर, वडगाव येथील ड्रेनेज पाईपलाईन वेळच्या वेळी साफ केली जात नसल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ती घाण केरकचरा गाळ आणि सांडपाण्याने तुंबली आहे.
यासंदर्भात स्थानिक नगरसेवकासह महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील अद्यापपर्यंत तक्रारींची दखल घेऊन ड्रेनेज स्वच्छ करण्यात आलेले नाही. परिणामी तुंबलेल्या ड्रेनेज मधील सांडपाणी जमिनीत झिरपून आसपासच्या विहिरींमध्ये पाणी दूषित होत आहे.
त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सध्या सर्वत्र पाणीटंचाईचे संकट असून भारतनगर देखील त्याला अपवाद नाही.
अशा परिस्थितीत दूषित होणारे विहिरीतील पाणी येथील रहिवाशांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे. तरी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर ड्रेनेजची युद्धपातळीवर स्वच्छता करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.