बेळगाव लाईव्ह :बेळगावसह सीमाभागातील तरुण उद्योजक, व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिकांना कोट्यवधींच्या कर्जाचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक करणारे एक टोळके कार्यरत झाले आहे. खानापूर तालुक्याच्या करंबळ या गावातील मुंबईला स्थायिक झालेला एक भामटा या टोळक्याचा प्रमुख असून त्यांचे जाळे नाशिक पर्यंत पसरले असल्याची माहिती मिळाली आहे. अनेकांना कर्जाचे आमिष दाखवून प्रोसेसिंग फी च्या नावाखाली लुबाडणूक सुरु आहे. याला अनेकजण फशी पडत असून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यासंदर्भात लवकरच बेळगाव पोलीस आयुक्तालय, मुंबई पोलीस आयुक्तालय आणि नाशिक आर्थिक गुन्हे विभागात तक्रारी दाखल होणार असून या टोळक्याला उघडकीस आणण्यात एका पत्रकाराने प्रमुख भूमिका निभावल्याची माहिती बेळगाव लाईव्ह ला मिळाली आहे.
आपण याच भागातील आहे. आपल्या संपर्कात मुंबई, अहमदाबाद आणि गुजरात येथील अनेक फंडर आहेत. त्यांचे कोट्यवधी पैसे पडून आहेत. पैसे कुजवण्यापेक्षा होतकरू उद्योजकांना मदत करायचा आमचा उद्देश आहे. यासाठी २५ हजार रुपये प्रोसेसिंग फी आहे असे सांगून संबंधित व्यक्ती फशी पाडते. २५ लाखांपासून कोट्यवधीपर्यंत कितीही रक्कम आम्ही देऊ शकतो असे सांगितले जाते. आम्ही असे जुने व्यवहार केले आहेत असे सांगून जुनाट कागदपत्रे आणि फाटके चेक दाखविले जातात. आणि एकदा का संबंधिताने २५ हजार दिले की त्याचा फोन ब्लॉक करणे, कारणे सांगणे असे प्रकार सुरु केले जातात.
आमची कर्ज देण्याची पद्धत वेगळी आहे. नाशिक येथील प्रेसमधून तुमच्या नावे बॉण्ड छापावे लागतात त्यासाठी तुम्ही किती कर्ज घेणार त्याच्या १० टक्के रक्कम भरावी लागेल असे सांगून पुन्हा रक्कम लाटली जाते. सदर बॉण्ड अतिशय हळुवार छापावे लागतात. ४५ दिवसांचा वेळ लागेल असे सांगून वेळ काढला जातो आणि काही दिवसांनी आपले पैसे बुडाले आहेत, हे संबंधितांच्या लक्षात येते. विचारणा केली की या शहरात आहोत, कोर्टाचे काम सुरु आहे, एकाचे १० कोटी द्यायला आलोय किंवा पैसे मोजतोय अशी कारणे देऊन वेळकाढूपणा केला जातो. हा प्रकार अनेकांसाठी आर्थिक लुटीचा ठरू लागला असून धंद्याला पैसे मिळतील या आशेने वाट बघणार्यांचा पोपट होऊ लागला आहे.
संबंधित करंबळवासी आणि त्याच्या नाशिक येथील भामट्या साथीदारांवर आता पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आपण देवीचे पुजारी आहोत, आम्ही एका समाजाच्या मंगल कार्यालयाला लाखोंची देणगी दिली आहे असे सांगून अनेकांना जाळ्यात ओढणाऱ्या त्या व्यक्तीने अनेकांना असेच फसविले असल्याचे दिसून येत आहे. अशा व्यक्तींपासून समाजाला धोका असून यांच्यावर पोलिसी कारवाई झाल्याशिवाय त्यांच्या कारवाया थांबणार नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहावे. कर्जासाठी स्थानिक सोसायट्या किंवा बँकांमध्ये रीतसर अर्ज करावा. बँकेच्या नादाला लागू नका असे सांगून प्रायवेट फायनान्स च्या नावाखाली फसवण्याचा प्रकार घडला असल्यास आपल्या नजीकच्या पोलीस स्थानकात जाऊन थेट तक्रार दाखल करावी. असे आवाहन करण्यात येत आहे.