बेळगाव लाईव्ह:नुकत्याच मंजूर झालेल्या कायद्यानुसार शहरात एपीएमसी भाजी मार्केट हे एकमेव होलसेल भाजी मार्केट असणार असून सर्वसंमतीने शहरातील फ्रुट मार्केट देखील त्या ठिकाणी सुरू करण्यास आपण तयार आहोत, असे आश्वासन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले आहे.
शहरातील फ्रुट मार्केट मधील व्यापाऱ्यांनी काल गुरुवारी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यावेळी त्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.
बेळगाव शहरातील एनएच -4 पी.बी. रोड येथील फळांच्या नव्या बाजारपेठेला अर्थात न्यू होलसेल फ्रुट मार्केटला अनेक समस्या भेडसावत आहेत. या फ्रुट मार्केटच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याबरोबरच अपघातही घडत आहेत.
याखेरीज पावसाळ्यात फ्रुट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन त्याचा व्यापारावर परिणाम होत असतो. आता नव्या एपीएमसी कायद्यानुसार शहरात एपीएमसी भाजी मार्केट हे एकमेव अधिकृत होलसेल भाजी मार्केट असणार आहे.
त्यामुळे एक तर फ्रुट मार्केटला भेडसावणाऱ्या समस्या कायमच्या दूर कराव्यात किंवा एपीएमसी भाजी मार्केटच्या ठिकाणी फ्रुट मार्केटचे स्थलांतर करावे अशी मागणी, फ्रुट मार्केट मधील व्यापाऱ्यांनी मंत्री जारकीहोळी यांच्याकडे केली आहे. त्यावेळी बोलताना एपीएमसीचे भाजी मार्केट एकमेव होलसेल भाजी मार्केट असणार असल्यामुळे सर्वसंमतीने शहरातील होलसेल फ्रुट मार्केट देखील त्या ठिकाणी सुरू करण्यास आपण तयार आहोत.
मात्र तत्पूर्वी तुम्ही माझ्या सचिवांना भेटून माहिती द्या, असे मंत्र्यांनी फळ व्यापाऱ्यांना सांगितले. याप्रसंगी एपीएमसीचे माजी अध्यक्ष शिवनगौडा पाटील यांच्यासह न्यू होलसेल फ्रुट मार्केटमधील अझीझ कणबर्गी, अब्दुल रहमान एस. हनगल, सलीम गोलवाले, इम्तियाज पठाण, मुजम्मिल एस. हनगल, रियाज संगोळी, रजाक काविलीवालेर इक्बाल सावनूर, मनोहर बदामी आदी फळ व्यापारी उपस्थित होते.