बेळगाव लाईव्ह :सदाशिवनगर लास्ट बस स्टॉप येथे डबल रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून एका विघ्न संतोषी दुचाकी स्वाराकडून डिफेक्टिव्ह बाईक सायलेन्सरचा कर्णकश आवाज करत दुचाकी सुसाट चालविण्याद्वारे ध्वनिप्रदूषणासह रात्रीची शांतता बिघडवण्याचा प्रकार केला जात असून पोलिसांनी त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून डिफेक्टीव्ह बाईक सायलेन्सरचा आवाज करत दुचाकी भरधाव चालविण्याचा प्रकार सदाशिवनगर लास्ट बस स्टॉप येथे डबल रोड मार्गावर सुरू आहे. रात्रीच्या शांत वेळी सुरू असलेल्या या त्रासदायक प्रकाराबद्दल नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी जेंव्हा विक्रम आमटे हे बेळगावचे डीसीपी होते त्यावेळी त्यांनी अशा शांतता बिघडवणाऱ्या गैरप्रकारांना आळा घातला होता. तथापि त्यांच्या बदलीनंतर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. एपीएमसी पोलीस जवळ असूनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदाशिवनगर, बॉक्साईट रोड, हनुमान नगर, शिवबसव नगर या ठिकाणी संबंधित व्यक्ती डिफेक्टिव्ह बाईक सायलेन्सरचा कर्णकश आवाजात मोटर सायकल चालवून मनस्ताप देत आहे. सध्या शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. अशावेळी नेमका रात्री 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान सदर मोटरसायकलस्वार परिसरातील शांतता बिघडवत असतो. त्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.