बेळगाव लाईव्ह : प्रथम नागरिक म्हणून मान असलेल्या महापौरांनी आज चक्क पायी घरी पोहोचत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आज आचारसंहिता जाहीर केल्यानंतर
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर सविता कांबळे या शासकीय वाहन ऐवजी चक्क पायी घरी निघून जातानाचा फोटो सोशल मीडियावर वायरल होत असून मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या सविता कांबळे यांच्या साधेपणाने बेळगावकरांचे लक्ष वेधले.
आचारसंहिता आज जाहीर होण्यापूर्वी सकाळपासून महापौर सविता कांबळे या नागरी सुविधांच्या कामात व्यस्त होत्या. सकाळी बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाला उपमहापौरांसमवेत भेट देऊन पाहणी केली.
यावेळी पाणीटंचाई आणि पाणीटंचाईवरील उपायांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चादेखील केली. यापाठोपाठ त्यांनी बसवणकोळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन येथील परिस्थितीसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद पार पडल्यानंतर आचारसंहिता जाहीर झाली आणि यानंतर महापौर सविता कांबळे यांनी पायी प्रवास करत थेट आपले घर गाठले, आणि हि बाब लक्षवेधी ठरली!