बेळगाव लाईव्ह : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून काँग्रेसने आपल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
ग्रामीण मतदार संघाच्या आमदार, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या नावाची शिफारस राज्यातून हायकमांडकडे गेली असून येत्या आठवड्यात आमदार पुत्राच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे भाजपमध्ये घराणेशाहीचा विरोध केला जात असूनही बेळगावचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार मंगला अंगडी यांच्याबाजूने उमेदवारीचे पारडे जड असून गेल्या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत अंगडी कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे घराणेशाहीचा वारसा लाभलेल्या काँग्रेस पक्षात देखील विद्यमान आमदार, मंत्री, खासदारांच्या कुटुंबीयांनाच उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे दिसत आहे.
भाजपमधून मंगला अंगडी, श्रद्धा अंगडी – शेट्टर, स्फूर्ती अंगडी – पाटील या अंगडी कुटुंबासह भालचंद्र जारकीहोळी, शंकरगौडा पाटील, महांतेश कवटगीमठ,आदींची नावे चर्चेत आहेत. जे. पी. नड्डा यांच्या बेळगाव भेटीनंतर अंगडी कुटुंबीयांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे भाजपमधील इच्छुक लॉबिंग करण्यात व्यस्त असल्याचेही समजते आहे.
काँग्रेसनेही आपला उमेदवार जवळपास निश्चित केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेसमधून सुरुवातीला जारकीहोळी कुटुंबियातील सदस्याला, किंबहुना सतीश जारकीहोळी यांनाच उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा पुढे आली होती. मात्र सतीश जारकीहोळी यांनीच लोकसभा निवडणूक लढविण्यात रस नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय जाणकारातून व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसमध्ये आजवर सतीश जारकीहोळी, प्रियांका जारकीहोळी, अमर सिंह पाटील, मृणाल हेब्बाळकर, डॉ. गिरीश सोनवलकर, डॉ. व्ही. एस. साधून्नवर आदींची नावे चर्चेत पुढे होती. मात्र दिल्ली दरबारी मृणाल हेब्बाळकर यांच्या नावाचे पारडे जड असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून येत्या आठवड्यात उमेदवार जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.