बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात प्रिंट (मुद्रण), इलेक्ट्रॉनिक आणि त्यापाठोपाठ डिजिटल मीडिया असोसिएशन स्थापन होत असून येत्या ७ मार्च रोजी निवृत्त न्यायाधीश अरविंद पाच्छापुरे यांच्यासह विविध सहकाऱ्यांच्या माध्यमातून बेळगावमध्ये डिजिटल न्यूज असोसिएशनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
नुकताच बेळगावमध्ये पार पडलेल्या डिजिटल न्यूज असोसिएशनच्या बैठकीत यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे.
कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारच्या परवानगीनुसार निवृत्त न्यायाधीश अरविंद पाच्छापुरे आणि विविध पत्रकारांनी या संघटनेची नोंदणी केली असून बेळगावमधील मराठी, कन्नड आणि इतर माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांना या असोसिएशनचे सभासदत्व घेता येणार आहे.
बदलत्या काळानुसार प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर आता डिजिटल मीडियाशी संबंधित संघटना अस्तित्वात येणार असून बेळगावमधील हि पहिलीच संघटना डिजिटल मीडियाशी संबंधित पत्रकारांसाठी काम करणार आहे.
डिजिटल मीडिया असोसिएशन ही पत्रकारातील बेळगावच्या पत्रकारितली एक क्रांतीच म्हणावी लागेल. डिजिटल मीडिया असोसिएशन ही पहिलीच डिजिटल मीडियाची संघटना आहे, ज्यासाठी सर्वच डिजिटल माध्यमातून स्वतंत्र काम करणाऱ्या पत्रकारांना सभासदत्व मिळणार आहे.
येत्या ७ मार्च रोजी संकम हॉटेल येथे सायंकाळी ४.०० वाजता डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तर मतदार संघाचे आमदार राजू सेठ, माहिती आयुक्त हेमंत निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
यावेळी डिजिटल न्यूज असोसिएशन सदस्यांची नोंदणी देखील करण्यात येणार असून ज्या व्यक्ती पत्रकार क्षेत्राशी संस्था चालवितात त्यांनी आपल्या संस्थेचे नाव आणि वेबसाईटची नावे नोंद करावीत. अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष महादेव पवार आणि दीपक सुतार यांच्याशी +९१९३५३२४५१०३, ९००८४८२४७१ या क्रमांकावर संपर्क साधावा, किंवा https://digitalnewsassociation.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.