बेळगाव लाईव्ह :बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या तिकीटासाठी अनेक काँग्रेस नेत्यांची आणि इतर अनेक नवीन चेहऱ्यांची सुरू असलेली लॉबी संपुष्टात आली आहे. कारण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका जारकीहोळी या चिक्कोडीमधून पक्षाच्या सर्वसहमतीच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे .तसेच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर बेळगावमधून निवडणूक लढवतील अशी माहिती समोर आली आहे.
अपेक्षेप्रमाणे, काँग्रेसला आपले गमावलेले गड परत मिळवण्यासाठी अखेर जारकीहोळी आणि हेब्बाळकर या दोन राजकीय प्रभावशाली घराण्यांवर अवलंबून राहावे लागले आहे. “मृणाल आणि प्रियंका यांना अनुक्रमे बेळगाव आणि चिक्कोडीमधून उमेदवारी मिळायला हवी अशी स्थानिक काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. तथापि, बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते आणि पक्षाचे हाय कमांड या विषयी अंतिम निर्णय घेतील,” असे हेब्बाळकर म्हणाल्या. काँग्रेस या दोन्ही जागांवर दोन घराण्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही उमेदवारी देणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती आणि हेब्बाळकरांच्या ताज्या विधानाने त्यात आणखी भर पाडली आहे.
“दोन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्याची क्षमता असलेल्या नेत्यांच्या अभावामुळे काँग्रेसला दोन कुटुंबातील सदस्यांना उभे करणे भाग पडले असावे. मृणाल आणि प्रियंका यांना उमेदवारी देणे हे लक्ष्मी हेब्बाळकर आणि सतीश जारकीहोळी यांच्या रिंगणात असण्याइतकेच चांगले आहे,” असे आणखी एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. दरम्यान सतीश यांनी मान्य केले की त्यांच्या मुलीला चिक्कोडीमधून पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी द्यावी की नाही? यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार या उभयतांनी अलीकडे आपल्या बेळगाव भेटीप्रसंगी चर्चा केली होती.
“मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळवले आहे की, चिक्कोडी येथील पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच प्रियंका यांना उमेदवारी द्यायची की नाही? यावर मी माझे मत देईन. तसेच त्याआधी संभाव्य उमेदवार (प्रियांका) निवडणूक लढवण्यास तयार आहे की नाही हेही पाहावे लागेल. तिने निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास अधिक कठीण होईल,” असे सतीश म्हणाले.
जाणकार सूत्रांनुसार काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने मृणाल आणि प्रियंका यांना दोन जागांसाठी उमेदवार म्हणून आधीच अंतिम केले आहे आणि आता ते फक्त पक्ष हायकमांडच्या होकाराची वाट पाहत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाच्या तिकिटासाठी अनेक इच्छुकांच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. बेळगावमधून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये अधिवक्ता मोहन कातर्की, डॉ. गिरीश सोनवलकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी आणि युवा काँग्रेसचे नेते किरण साधुनावर यांचा समावेश आहे. चिक्कोडीतून लक्ष्मणराव चिंगळे आणि प्रकाश हुक्केरी हे प्रबळ दावेदार होते.