बेळगाव लाईव्ह :बसवन कुडची, बेळगांव येथील जयवंत गुंडू हम्मन्नावर यांची पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीआय) च्या सरचिटणीस पदी अभिनंदनीय निवड झाली आहे.
आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक असलेल्या जयवंत हम्मन्नावर यांनी आपले मागील दशक गोवा राज्यातील पीसीआयच्या उपक्रमांना समर्पित केले आहे. याव्यतिरिक्त ते माजी व्हॉलीबॉल खेळाडू असून संपूर्ण भारतभर बीच व्हॉलीबॉल या क्रीडा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असतात.
पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या गेल्या 9 मार्च 2024 रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये माजी पॅरालिम्पिक पदक विजेता देवेंद्र झाझरिया यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचप्रमाणे सरचिटणीस पदी बेळगावच्या जयवंत हम्मन्नावर यांना निवडण्यात आले.
पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया (पीसीआय) ही देशातील एकमेव संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती, राष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती आणि भारत सरकारद्वारे राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून मान्यता प्राप्त आहे.
भारतातील दिव्यांग व्यक्तींसाठी पॅरा स्पोर्ट्सचा प्रचार आणि विकास करणे हे या महासंघाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पीसीआय सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल जयवंत हम्मन्नावर यांचे बसवन कुडची गावासह क्रीडा क्षेत्रात अभिनंदन होत आहे.