बेळगाव लाईव्ह : आजवर विविध क्षेत्रात बेळगावचे नाव उंचावले गेले आहे. आता यात भर पडली आहे ती, महिला आयपीएलमध्ये चमकलेल्या क्रिकेटरपटूची! नुकत्याच पार पडलेल्या महिला आयपीएलमध्ये बेंगळुरुरचा संघ चॅम्पियन म्हणून पुढे आला.
या संघात श्रेयांका पाटील हिचा देखील सहभाग होता. क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेत संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या श्रेयांका पाटील हिचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून तिचे बेळगावशी जवळचे नाते असल्याचे पुढे आले आहे.
बैलहोंगल शहरातील प्रसिद्ध व्यापारी शिवकुमार आणि प्रेमा मेटगुड्ड यांची कन्या प्रविणा हि श्रेयंकाची आई असून लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या श्रेयांकाने आजवर आपले क्रिकेटप्रेम जोपासले आहे.
सोशल मीडियावर सध्या श्रेयांकाचे अनेक व्हिडीओ वायरल होत आहे. बैलहोंगल हे आजोळ असणाऱ्या श्रेयांकाचे वडील राजेश पाटील हे कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यातील कोलाकूर या गावातील क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक आहेत. राजेश पाटील हे लग्नानंतर आपली पत्नी प्रविणा यांच्यासोबत बेंगळुरू येथे स्थायिक झाले.
लहानपणापासून क्रिकेटचे वेड जोपासणाऱ्या श्रेयांकाने अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा आदर्श घेत बेंगगळुरूच्या जस्ट, सिक्स अँड नाइस क्रिकेट अकादमीमधून कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या ती अर्जुन देव यांच्या मार्गदर्शनाखाली नाइस क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असून श्रेयांकाचे बैलहोंगलशी आणि पर्यायाने बेळगावशी असलेले नाते हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.